नजफगडमध्ये तरुण यादव यांचा कैलाश गेहलोत यांच्याशी सामना होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान आम आदमी पक्षाने शुक्रवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत केवळ एका नावाची घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीने नजफगडमधून तरुण यादव यांना तिकीट दिले आहे. या जागेवरून आपचे माजी नेते कैलाश गेहलोत यांनी गेल्यावेळी निवडणूक जिंकली होती. मात्र, गेहलोत यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर तरुण यादव यांनी नुकताच आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. आता नजफगड मतदारसंघात तरुण यादव आणि कैलाश गेहलोत यांच्यात लढत होऊ शकते, असे मानले जात आहे. मात्र, नजफगढमधून भाजपने अद्याप आपला उमेदवार उभा केलेला नाही.
आम आदमी पार्टीने यापूर्वीच्या आपल्या दोन यादीत 31 उमेदवारांची घोषणा केली होती. पहिल्या यादीत 11 तर दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नुकतीच दिल्लीत आम आदमी पार्टीच्या पीएसीची बैठक झाली. या बैठकीत 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यावेळी पक्षाने मनीष सिसोदिया यांना जंगपुरामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राखी बिर्ला मादीपूरमधून निवडणूक लढवत आहेत. पटपरगंजमधून अवध ओझा आणि शाहदरा येथून जितेंद्र सिंह शांती यांना उमेदवारी देण्यात आली आहे.









