घटनास्वीकाराच्या अमृत महोत्सावानिमित्त लोकसभेतील चर्चेत राजनाथ सिंग यांचा घणाघात
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘भारताची राज्यघटना हा केवळ प्रशासनासाठीचा मार्गदर्शक ग्रंथ नसून तो भारताची प्रतिष्ठा आणि सन्मान पुनर्थापित करण्यासाठीचा पथदर्शक आहे. भारताला जगाच्या व्यासपीठावर महत्वाचे स्थान मिळवून देण्यासाठीची ती संहिता आहे, अशी भलावण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. घटनास्वीकारच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसांच्या विशेष चर्चासत्राचा लोकसभेत प्रारंभ करताना त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.
आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेस आज घटनेच्या नावाने गळा काढत आहे. पण या पक्षाला घटनेपेक्षा सत्ता अधिक प्रिय आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:ची सत्ता वाचविण्यासाठी देशात 1975 मध्ये आणीबाणी लागू करुन हे सिद्ध केले आहे. आणीबाणी हा घटनेवरचा सर्वात मोठा हल्ला होता, अशा घणाघात त्यांनी आपल्या भाषणात केला.
आम्हाला व्याख्याने देऊ नयेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने याच घटनेच्या आधाराने मोठी प्रगती साधली आहे. काँग्रेसचे घटनाप्रेम बेगडी असून याच पक्षाने सर्वाधिक वेळा घटनेची पायमल्ली केली आहे. आता हा पक्ष आम्हाला घटना शिकवत आहे, हे आश्चर्यकारक असून या पक्षाला आम्हाला उपदेश करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा अर्थाची टीकही त्यांनी आपल्या भाषणात पुढे केली.
एका पक्षाकडून अपहरणाचा प्रयत्न
पंडित मदनमोहन मालवीय, लाला लाजपत राय, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीकारक भगत सिंग यांच्यासारख्या महान देशभक्तांच्या विचारांनी घटनेला बळ दिले आहे. तथापि, घटनानिर्मितीच्या काळातही एका विशिष्ट पक्षाने सातत्याने घटनानिर्मितीची प्रक्रिया आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आपली घटना ही एका विशिष्ट पक्षाची देणगी नसून भारताच्या पायाभूत मूल्यांचा सन्मान ठेवणारा अतुलनीय ग्रंथ आहे, असेही विचार राजनाथसिंग यांनी व्यक्त केले.
बळकटीसाठीच घटना परिवर्तन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 10 वर्षांमध्ये अनेकदा घटनेत परिवर्तन करण्यात आले. मात्र, या परिवर्तनांमागचा हेतू घटना बळकट करण्याचाच होता. आपली घटना ही लवचिक, परिवर्तनशील आणि काळासमवेत पुढे जाणारी आहे. त्यामुळे परिवर्तनांचे तिला वावडे नाही. घटनेच्या मूळ तत्वांना बाधा पोहचविणारा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याचा निर्णय यासाठीच घेण्यात आला होता. महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देणारी घटनादुरुस्तीही आम्ही केली. या सर्व निर्णयांमुळे घटनेचा पाया बळकट झाला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
काँग्रेसचा हेतू संशयास्पद
काँग्रेसने अनेकदा घटनेत परिवर्तन केले. तथापि, अशी परिवर्तने करण्यामागचा या पक्षाचा हेतू संशयास्पद होता. टप्प्याटप्प्याने घटनेचा मूळ पायाच उखडण्याचा या पक्षाचा प्रयत्न होता. त्यामुळेच जवाहरलाल नेहरु यांच्या 17 वर्षांच्या काळात घटनेत 17 वेळा परिवर्तन करण्यात आले, अशी टीकाही त्यांनी भाषणात केली.
प्रियांका गांधींचे प्रथमच भाषण
काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी चर्चेत प्रथम सहभागी होणार होते. तथापि, ऐनवेळी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधींवर ही धुरा सोपविण्यात आली. त्यामुळे त्यांना लोकसभेत त्यांचे प्रथम भाषण करण्याची संधी मिळाली. सत्ताधाऱ्यांनी घटनेची पायमल्ली चालविली आहे, असा आरोप त्यांनी केला. भारताची घटना हे न्याय, एकात्मता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे सुरक्षा कवच आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी हे कवच तोडण्याचा प्रयत्न केला आहे. घटना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची संहिता आहे. मात्र हे घटनेचे वैशिष्ट्या संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. लॅटरल एंट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण दुर्बळ करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. संभल येथील हिंसाचाराचा त्यांनी उल्लेख केला. या हिंसाचारात पोलिसांनी निरपराध नागरिकांची हत्या केली, असाही दावा त्यांनी केला. सध्याचे सत्ताधीश केवळ एका व्यक्तीसाठी आर्थिक धोरणे आणत आहेत. केवळ काही धनाढ्या लोकांनाच या धोरणांचा लाभ होत आहे. सर्वसामान्य आणि गरीब जनता मात्र, परावलंबी होत आहे, असा प्रहार त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर केला. इंदिरा गांधींनी लागू केलेली आणीबाणी योग्य नव्हती, असे आपले मत असल्याचा संकेतही त्यांनी दिला. सध्याच्या केंद्र सरकारने अनेक चुका केल्या असून त्यामुळे देश अधोगतीला गेला. घटनेचा पाया दुर्बळ झाला, असे प्रतिपादन त्यांनी केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि प्रियांका गांधी यांचे बंधू राहुल गांधी यांनी आपल्या बहिणीच्या सभागृहातील पहिल्याच भाषणावर समाधान व्यक्त केले आहे. ‘संसद सभागृहातील माझ्या पहिल्या भाषणापेक्षा प्रियांकांचे भाषण निश्चितच चांगले झाले आहे’, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्यांची बैठक
शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. घटनेविषयी चर्चेच्या वेळी कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा, यावर बैठकीत धोरण ठरविण्यात आले. तसेच वक्त्यांच्या नावावरही अंतिम निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कायदा मंत्री किरण रिजीजू, केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश न•ा इत्यादी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती नंतर देण्यात आली.
कसा आहे चर्चेचा कार्यक्रम…
घटनास्वीकार अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ही चर्चा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये होणार आहे. लोकसभेत ती शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस होणार असून राज्यसभेत सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस निर्धारित करण्यात आले आहेत. प्रत्येक पक्षाच्या त्याच्या लोकसभतेतील आणि राज्यसभेतील सदस्यांच्या संख्येच्या प्रमाणात वेळ देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने 10 वक्त्यांची घोषणा केली असून त्यांच्यात राजनाथसिंग, किरण रिजीजू, अपराजिता सारंगी, तेजस्वी सूर्या आदी सदस्यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे त्यांचे विचार मांडणार आहेत. शुक्रवारी काँग्रेसनेही अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, खर्गे, जयराम रमेश आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसनेही या बैठकीत आपले धोरण ठरविले आहे.
घटनास्वीकार दिन
प्रत्येक वर्षाचा 26 नोव्हेंबर हा दिवस घटनास्वीकार दिन म्हणून मानला जातो. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी, अर्थात 75 वर्षांपूर्वी भारताच्या घटनासमितीने औपचारिकरित्या भारताच्या राज्य घटनेचा स्वीकार केला होता. या घटनेचा यावर्षी अमृतमहोत्सव आहे. घटनेचा स्वीकार केल्यामुळे भारत एक सार्वभौम आणि गणतंत्रीय राष्ट्र म्हणून जगात परिचित झाला. मात्र, घटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबरला करण्यात आला असला, तरी तिचे क्रियान्वयनाचा प्रारंभ त्यानंतर दोन महिन्यांनी, अर्थात 26 जानेवारी 1950 या दिवसापासून झाला होता. 26 नोव्हेंबर हा दिवस घटनास्वीकार दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 2015 मध्ये घेतला होता. तेव्हापासून हा दिवस घटनास्वीकार दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येत आहे.
प्रमुख वक्त्यांचे विचार
ड प्रगतशील भारताचा पथदर्शक हे आपल्या राज्यघटनेचे अनन्यसाधारण महत्व
ड आणीबाणीचा कालाधी हा घटनेच्या पावित्र्याच्या दृष्टीने सर्वाधिक नकारात्मक
ड लवचिकत्व तसेच काळानुसार पुढे परिवर्तन हे घटनेचे महत्वाचे मोठे वैशिष्ट्या
ड परिस्थितीनुसार झालेल्या परिवर्तनांमुळे ही घटना अधिक बलवान, कालसुसंगत
ड भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगतीचा पाया राज्यघटनेमुळेच
ड अनेक आव्हानांना तोंड देऊनही आज घटना सुस्थिर, सबळ आणि सुस्पष्ट









