विदेशमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत अन्य शेजारी देशांप्रमाणेच पाकिस्तानसोबत चांगले संबंध राखू इच्छितो. परंतु आम्हाला दहशतवादमुक्त शेजारी हवा आहे असे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी लोकसभेत म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी सरकारकडून उचलण्यात आलेल्या पावलांविषयी जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
दहशतवादावर भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. पाकिस्तानसमोर देखील वारंवार आमची भूमिका मांडण्यात आली आहे. स्वत:चे जुने वर्तन बदलत आहोत हे पाकिस्तानला दाखवून द्यायचे आहे, जर पाकिस्तानला स्वत:चे वर्तन बदलायचे नसेलतर याचा प्रभाव द्विपक्षीय संबंधांवर पडणार असे जयशंकर यांनी म्हटले आहे. भाजप खासदार नवीन जिंदल यांनी सरकार भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी काय करत आहे अशी विचारणा लोकसभेत केली होती.
अन्य शेजारी देशांप्रमाणेच आम्ही पाकिस्तान सोबत देखील संबंध सुधारू इच्छितो. परंतु अन्य शेजाऱ्यांप्रमाणे आम्ही पाकिस्तानात दहशतवादाला थारा मिळू नये असे इच्छितो. भूतकाळात ही भूमिका पाकिस्तानने घेतली होती ती त्याला बदलावी लागणार आहे. अन्यथा याचा परिणाम संबंधांवर पडणार असल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे. याप्रकरणी चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात असून काय करावे लागणार हे त्याला माहित आहे असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
भारताने वारंवार पाकिस्तानसमोर सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. 2019 मध्ये पाकिस्तानच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे व्यापारी संबंध बिघ्डले आहेत असे जयशंकर यांनी सांगितले आहे.









