पहिल्यांदाच बांगलादेशच्या सीमेवर बंडखोरांचा कब्जा
वृत्तसंस्था/ नेपीदॉ
म्यानमारमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या गृहयुद्धात बंडखोर गटांना मोठे यश मिळाले आहे. तर जुंटा शासनाच्या सैन्याची मोठी हार झाली आहे. अराकान आर्मी (एए)ने सैन्याचा मजबूत बालेकिल्ला बीजीपी5 बॅरकवर कब्जा केला आहे. हा बॅरक रखाइन प्रांतात बांगलादेशच्या सीमेनजीक आहे. अशा स्थितीत देशाचा सीमावर्ती भाग जुंटा शासनाला गमवावा लागला आहे. आता अराकान आर्मीचे बांगलादेशला लागून असेलल्या म्यानमारच्या सीमेवर नियंत्रण आहे.
2021 च्या सत्तापालटापासून सैन्याची ही मोठी हार आहे. यामुळे म्यानमारमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाला नवे वळण मिळणार आहे, कारण अराकान आर्मी आता पूर्ण रखाइन प्रांताला नियंत्रित करत आहे. केवळ राजधानी सित्वेवरच सैन्याचे नियंत्रण राहिले आहे.
म्यानमारमध्ये 2021 पासून सैन्याच्या विरोधात अराकान आर्मी लढत असून अनेक भागांवर कब्जा देखील केला आहे. याच क्रमात आता बीजीपी5 तळावर कब्जा हा अराकान आर्मीचा सर्वात मोठा विजय आहे. यामुळे सैन्याची स्थिती अत्यंत कमकुवत झाली असून बंडखोर गटाचा प्रभाव वाढला आहे. बीजीपी5 तळा म्यानमार सैन्यासाठी रखाइन प्रांतात अखेरचा बालेकिल्ला होता. अराकान आर्मीने या तळाला अनेक महिन्यांपासून घेरले होते आणि भीषण हल्ल्यानंतर अखेर कब्जा केला आहे. रोहिंग्लाबहुल भागातील हा तळ सुमारे 20 हेक्टरमध्ये फैलावलेला आहे.
म्यानमारच्या जुंटा सैन्याच्या बीजीपी5 तळाच्या चहुबाजूला खंदक तयार करण्यात आले होते. यात अनेक बंकर आणि एक हजारपेक्षा अधिक भूसुरुंग पेरण्यात आले होते. दीर्घ संघर्षानंतरही सैन्याला हा तळ सुरक्षित ठेवता आला नाही. जुंटा सैन्य सातत्याने अराकान आर्मीसमोर पराभूत होत आहे. पहिल्यांदाच सैन्याचे पूर्ण सीमेवरील नियंत्रण संपुष्टात आले आहे. बांगलादेशला लागून असलेली 270 किलोमीटर लांबीची सीमा आता पूर्णपणे अराकान आर्मीच्या ताब्यात आहे.









