कोल्हापूर :
आमदार अमल महाडीक यांनी पर्यटन व्यवसायिक यांच्याशी संवाद साधला. व्यावसायिकांच्या विविध समस्या आणि कोल्हापुरातील पर्यटन हे डेस्टिनेशन म्हणून अधिक लोकप्रिय कसे करता येईल या विषयावर विस्तृत चर्चा केली.
गेल्या चार वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर –मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ही तातडीने सुरू करण्यात यावी ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे. कोल्हापुरातून आठवड्यातून एकदा सुटणाऱ्या निजामुद्दीन व अहमदाबाद या एक्सप्रेस दररोज सुरू कराव्यात. मिरजेतून सुटणारी राणी चन्नम्मा एक्सप्रेस पूर्ववत कोल्हापुरातून सोडण्यात यावी. जयपूर, कोलकत्ता, त्रिवेंद्रम व एरणाकुलम या ठिकाणी कोल्हापुरातून रेल्वे सेवा सुरू व्हाव्यात. कोल्हापुरात वंदे भरत रेल्वे मुंबई पर्यंत असावी व ही ट्रेन दररोज सुटावी तसेच त्याच्या तिकीट दराचाही विचार करावा. कोल्हापूरात रेल्वेचे डबे हे जुने असून कालबाह्य झाले आहेत. त्या ट्रेनला सर्व सोयींनी परिपूर्ण असे अद्ययावत नवे डबे जोडण्यात यावेत आणि यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी बैठकीत झाली.
हेरिटेज वास्तूंचे जतन आणि नूतनीकरण, लेसर आणि साऊंड शो, कोल्हापूर पर्यटनासाठी विशेष गाडी, शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आणि कृती आराखडा ठरविण्यात आला.
हेरंब परांजपे, अतुल पाटील, वैभव कुलकर्णी, दीपक शिरोडकर, प्रताप पाटील, स्वप्नील रामनामे, अभिजीत कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व सदस्यांनी चर्चेत भाग घेतला व आपले मुद्दे मांडले. आ. अमल महाडिक यांनी चर्चेत उपस्थित झालेल्या सर्व मुद्यांना योग्य उत्तरे देऊन यावर प्रत्यक्ष कृती करण्याचे आश्वासन दिले.








