कोल्हापूर :
पंचगंगा, वारणा नदी प्रदूषित करणारे कारखाने बंद करा, अशी मागणी जयशिवराय किसान संघटनेच्यावतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली. उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांना नदी प्रदूषणावरून धारेवर धरले. बाटलीतून आणलेले प्रदूषित पाणीही त्यांच्या निदर्शनास आणले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोल्हापूर व सांगली जिह्यांमधून वाहणाऱ्या वारणा नदीमध्ये गेली. सात ते आठ दिवस पाणी प्रदूषण झाल्यामुळे मासे व जलचर प्राणी मृत आढळून आले आहेत. प्रत्येक वर्षी असे दूषित पाणी सोडून कारखानदार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. दुषित पाण्यामुळे वारणा नदी काठावरील कोल्हापूर व सांगली जिह्यातील सर्व गावांमध्ये रोगराई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. दुषित पाण्यामुळे पर्यावरणाची देखील हाणी झाली आहे. तरीही पाणी प्रदूषित करणाऱ्यांविरोधात काहीही कारवाई केलेली दिसून येत नाही. हीबाब अतिशय गंभीर असून देखील ज्या साखर कारखान्यांनी पाणी दुषित केले आहे. त्यांच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालक यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे. नागरिकांच्या, जलचर प्राण्यांच्या तसेच पाळीव जनावरे, पशु–पक्षी यांच्या जीवतास धोका निर्माण केल्याबद्दल जलकायदा 1974 अन्वये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. 17 डिसेंबर 2024 पर्यंत कायदेशीर कारवाई न केल्याचे दिसून आल्यास कार्यालयास घेराओ घालू, असा इशाराही देण्यात आले. यावेळी जयशिवराय संघटनेचे शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, महादेव धनवडे, सुभाष सुतार, विजय माने, गब्बर पाटील, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.
प्रदूषण नियंत्रण की प्रदूषणाला प्रत्सोहन देण्याचे काम ?
प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी दिलेल्या अधिकाराचा वापर करत नाही. दिवसा ढवळ्या माणसांना ठार मारण्याचा प्रकार सुरू आहे. प्रदूषणाला नियंत्रण करायाचे की प्रदूषण प्रोत्साहन देण्याचे काम करते, असा सवाल ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.








