दापोली :
दापोली आगारामध्ये मातांसाठी हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हा कक्ष दरवेळी कुलूपबंद असल्याने प्रवासी मातांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हा कक्ष दापोली आगाराच्या चौकशी विभागाच्या एकदम बाजूला आहे. यामुळे या ठिकाणी लक्ष ठेवणेही सोयीस्कर आहे. परंतु हा कक्ष कुलूप लावून बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे आगारातून प्रवास करणाऱ्या ज्या मातांना स्तनपान द्यायचे आहे, त्यांना चौकशी विभागातून चावी घेऊन दार उघडून दिले जात आहे. परंतु प्रत्येकवेळी चावी मागायला कसे जायचे, असा प्रश्न मातांकडून उपस्थित केला जात असून
हा कक्ष कायमस्वरुपी खुला ठेवण्याची मागणी होत आहे.
मात्र दुसरीकडे हा कक्ष सुरू ठेवल्यास अनुचित घटना घडणार नाही ना? किंवा कोणी चुकीच्या कामांसाठी वापर करणार
नाही ना? असा प्रश्नही काही प्रवाशांनी उपस्थित केला आहे. मात्र यावर दापोली आगार प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणीही महिला प्रवाशांतून जोर घरत आहे.








