कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठक : शाळांच्या विकासासाठी नवे उपक्रम
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये ब्रिटिशकालीन नाव बदलून शहीद, स्वातंत्र्य सैनिक व थोर व्यक्तींची नावे देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. मध्यंतरी काही संघटनांनी आक्षेप नोंदविल्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. एकूण 77 जणांनी आपला अभिप्राय दिला होता. त्यामध्ये 65 संघटनांनी आहे तीच नावे ठेवण्याची सूचना केली होती. त्यानुसार काही नावांमध्ये बदल करत अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता कॅम्पमधील जुनी नावे बदलून त्याठिकाणी नवीन नावे मिळाली आहेत. कॅन्टोन्मेंटची मासिक बैठक गुरुवारी अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडली.
बैठकीमध्ये सीईओ राजीवकुमार यांनी विविध मुद्दे समाविष्ट केले. कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्षकांचा अहवालाही घेतला जाणार आहे. विविध प्रशिक्षणामार्फत शिक्षकांना अपडेट करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बैठकीदरम्यान सांगण्यात आले. कॅम्प परिसरात एखादे वाचनालय असावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल, अशी मागणी सुधीर तुपेकर यांनी केली. यासंदर्भात चर्चा करून ओल्ड पोस्ट ऑफिस रोडवरील एका हॉलमध्ये वाचनालयाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्याठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी कूपनलिकांची खोदाई करून पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी तुपेकर यांनी केली. कॅम्पमधील गवळी गल्ली परिसरात एखादी कूपनलिका खोदाई करण्याबाबत चर्चा झाली.
महापालिका-स्मार्ट सिटीला पत्र
वेंगुर्ला रोडचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जाणार आहे. याठिकाणी पथदीप बसविण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम खात्याला करण्यात आली आहे. त्याचबरोबर गांधी स्मारक येथे हायमास्ट व क्लब रोडवर पथदीप बसविण्यासंदर्भात महापालिका व स्मार्ट सिटीला पत्र पाठविल्याची माहिती अभियंता सतीश मण्णूरकर यांनी दिली.
क्विन गार्डनला मिळणार भगिनी निवेदितांचे नाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक गार्डन तसेच रस्त्यांना नवीन नावे देण्यात आली. कॅम्पमधील क्विन गार्डनला भगिनी निवेदितांचे नाव मिळावे असा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी मांडला. याला कॅन्टोन्मेंट बोर्डने गुरुवारच्या बैठकीत मंजुरी दिली. यामुळे यापुढे क्विन गार्डनला स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदितांचे नाव मिळणार आहे. याबरोबरच नॉर्थ टेलिग्राफ रोडला बेळवडी मल्लम्मा, स्मार्ट रोडला शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी, पिकेट रोडला लान्स नायक हनुमंतप्पा रोड, कॅम्पमधील पोस्ट गार्डन रोडला गंगुबाई हनगल तर एक्साईज गार्डनला पं. भीमसेन जोशी यांचे नाव देण्याचे निश्चित केले.









