2030 चा चषक स्पेन, मोरोक्को, पोर्तुगालमध्ये संयुक्तपणे होणार : महिलांच्या विश्वचषकाचे यजमानपद ब्राझीलकडे
वृत्तसंस्था/झ्युरिच
2034 साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन सौदी अरेबिया करणार असल्याची घोषणा फुटबॉलची सर्वोच्च संघटना असलेल्या फिफाने केली आहे. याशिवाय 2030 फिफा विश्वचषकही जाहीर झाला आहे. 2030 च्या विश्वचषकाचे आयोजन स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को हे संयुक्तपणे करतील. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फन्टिनो यांनी ही घोषणा केली. यजमानपदासाठी सौदी अरेबियासमोर कोणतेही आव्हान नव्हते. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी झ्युरिच येथे झालेल्या बैठकीत 200 हून अधिक सदस्य देशांनी एकमताने याला मंजुरी दिली. फिफा अध्यक्ष इन्फन्टिनो म्हणाले, आम्ही फुटबॉल अधिक देशांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला फिफा विश्वचषकात अधिकाधिक संघांचा सहभाग हवा आहे. कतारनंतर सौदी अरेबिया विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक असल्याने आम्हाला याचा आनंद आहे. फिफाकडून सौदीला आयोजनासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
2030 मध्ये युरोपमधील तीन देश संयुक्तपणे आयोजन करणार
दुसरीकडे, झ्युरिचमधील बैठकीत 2030 मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या आयोजनाची घोषणाही करण्यात आली. पोर्तुगाल, स्पेन व मोरोक्को हे देश 2030 च्या विश्वचषकाचे यजमानपद संयुक्तपणे भूषवणार आहेत. तर तीन दक्षिण अमेरिकन राष्ट्रे (पराग्वे, अर्जेंटिना आणि उरुग्वे) स्पर्धेच्या शताब्दी समारंभाचा भाग म्हणून प्रत्येकी एक सामना आयोजित करतील. उरुग्वे या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्याचे यजमानपद भूषवेल तर दुसरा आणि तिसरा सामना अर्जेंटिना आणि पराग्वेमध्ये होईल. विशेष म्हणजे, पोर्तुगाल देखील प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे तर 1982 नंतर स्पेन दुसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करत आहे. उरुग्वे 100 वर्षांनंतर स्पर्धेच्या सामन्याचे आयोजन करेल, 1930 मध्ये उद्घाटन आवृत्तीचे आयोजन केले होते, तर 1978 ची आवृत्ती अर्जेंटिना येथे आयोजित केली होती. पराग्वेलाही इतिहासात प्रथमच मेगा इव्हेंटची चव चाखायला मिळणार आहे.
महिलांचे यजमानपद ब्राझीलकडे
दरम्यान, झ्युरिक येथे झालेल्या बैठकीत महिला फिफा विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबतही घोषणा करण्यात आली. 2027 मध्ये होणारा महिला विश्वचषक 24 जून ते 25 जुलै दरम्यान ब्राझीलमध्ये खेळवला जाईल, अशी घोषणा फिफाने मंगळवारी केली. दक्षिण अमेरिकेतील एखाद्या देशात ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली जाणार आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. स्पेन हा सध्याचा चॅम्पियन आहे. त्यांनी 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या स्पर्धेत महिला विश्वचषक जिंकला होता. फिफा पुढील वर्षी स्पर्धेसाठी ब्राझीलची यजमान शहरे आणि स्टेडियमची घोषणा करण्याची शक्यता आहे. एकूण 12 स्टेडियम्सनी सामन्याच्या आयोजनासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पुढील बैठकीत यावर चर्चा होऊन शिक्कामोर्तब करण्यात येईल असेही इन्फॅटिनो यांनी सांगितले.
2026 चा वर्ल्डकप अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोमध्ये
पुढील फुटबॉल विश्वचषक 2026 मध्ये होणार आहे. याचे आयोजन अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करीत आहेत. स्पर्धेसाठी दीड वर्षाहून कमी कालावधी राहिला असून स्पर्धेची तयारी वेगाने सुरु असल्याची माहिती फिफाकडून देण्यात आली. 11 जून ते 19 जुलै या कालावधीत उत्तर अमेरिकेतील या तीन देशात ही स्पर्धा होणार असल्याने चाहत्यांना याची उत्सुकता लागली आहे.









