नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर साडेपाच टक्क्यांवर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई (सीपीआय) 5.48 टक्क्यांवर घसरली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये हा दर 6.21 टक्के होता. बुधवारी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारणाऱ्या संजय मल्होत्रा यांच्यासाठी ही पहिली खुशखबर आहे. आरबीआयने महागाई दर 4-6 टक्क्यांच्या श्रेणीत ठेवण्याचे लक्ष्य ठेवले असताना नोव्हेंबरमध्ये हा दर पुन्हा 6 टक्क्यांच्या खाली आला आहे. महागाईच्या आघाडीवर ऑक्टोबर महिन्यात किरकोळ दरवाढ झपाट्याने वाढून 6 टक्क्यांच्या पुढे गेली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात ती 5.48 टक्क्यांवर आली आहे. खाद्यपदार्थ, विशेषत: भाजीपाल्यांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाल्याचे सरकारने म्हटले आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत भाजीपाल्याच्या किमतीतील वार्षिक वाढीचा दर 42.18 टक्क्यांवरून 29.33 टक्क्यांवर आल्यामुळे किरकोळ महागाईत घट नोंदवली गेली.
ऑक्टोबर महिन्यात 10.87 टक्क्यांवर असलेल्या अन्नधान्याच्या किंमती नोव्हेंबरमध्ये 9.04 टक्क्यांपर्यंत घसरल्या. धान्य आणि डाळींच्या महागाई दरातही किंचित घट झाली आहे. डाळींचा महागाई दर 7.43 टक्क्यांवरून 5.41 टक्क्यांवर आला आहे. मात्र, ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळे परिणाम दिसून आले. ग्रामीण चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये 6.68 टक्क्यांवरून 5.95 टक्क्यांवर गेला आहे, तर शहरी महागाई 5.62 टक्क्यांवरून 4.83 टक्क्यांपर्यंत खाली आली. भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या किमतीतील स्थिरता हे महागाई कमी होण्याचे प्रमुख कारण होते. सप्टेंबरमध्ये खाद्यतेलावर लादण्यात आलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा परिणाम होऊनही आता त्यांच्या किमती स्थिर राहण्याची चिन्हे दिसत आहेत. वीज, इंधन महागाई -1.61 टक्क्यांवरून -1.83 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. कापड, बूट यांच्या दरात वाढ झाली असून हा दर 2.70 टक्क्यांवरून 2.75 टक्क्यांपर्यंत वाढला.









