केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई
वृत्तसंस्था/नारायणपूर
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गुरुवारी यासंदर्भात सुरक्षा दलाकडून माहिती जारी करण्यात आली. नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमद भागात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी दिवसभर जंगलभागात नक्षलवाद्यांचा शोध सुरू होता. मात्र, अन्य नक्षलवाद्यांचा मागमूस लागलेला नाही. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्याचा दौरा करणार असून त्यांच्या भेटीपूर्वी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नक्षलवादी संघटनांची पाळेमुळे खणून काढल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यापूर्वीच गृहमंत्र्यांनी दिलेला आहे.
10 डिसेंबरपासून नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर आणि कोंडागाव जिल्ह्यात जिल्हा राखीव दल ‘डीआरजी’, एसटीएफ (विशेष कृती दल) आणि सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलिस दल) यांचे संयुक्त पथक नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करत होते. जवळपास हजारहून अधिक जवानांना दक्षिण अबुझमद भागात दहशतवादविरोधी कारवाईत तैनात करण्यात आले होते. या कारवाईदरम्यान गुरुवारी पहाटे 3 वाजता सुरक्षा दल परिसरात असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. अन्य नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी सदर भागात शोधमोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती संकलित करण्यात येत आहे.
11 डिसेंबर रोजी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या केली होती. जिल्ह्यातील फरसेगढ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनपल्ली गावात नक्षलवाद्यांनी एकाची हत्या केली होती. मंगळवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांच्या एका गटाने सोमनल्ली गावात पोहोचून कुडियाम माडो यांना घराबाहेर काढल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्याची गळा आवळून हत्या केली. ही हत्या केल्यानंतर नक्षलवादी तेथून पळून गेले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या नॅशनल पार्क एरिया कमिटीने जारी केलेले पॅम्प्लेट जप्त केले होते यात त्यांनी गावकऱ्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता. सध्या नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.









