दिल्लीत अरविंद केजरीवालांची घोषणा : निवडणुकीनंतर 2100 रुपये जमा करणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. दिल्ली सरकारने स्वत:चे आश्वासन पूर्ण करत महिला सन्मान निधी योजनेला मंजुरी दिली आहे. दिल्लीतील माझ्या भगिनी आणि मातांच्या बँक खात्यात दर महिन्याला हजार रुपये जमा केले जाणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत गुरुवारी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. राजधानीतील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व महिलांच्या खात्यांमध्ये दर महिन्याला ही रक्कम जमा होणार आहे. याकरता महिलांना नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या महिलेच्या बँक खात्यात दर महिन्याला हजार रुपये जमा होऊ लागतील असा दावा केजरीवालांनी केला आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाला 60 पेक्षा अधिक जागा जिंकता न आल्यास भाजप ही योजना लागू होऊ देणार नाही. याचमुळे महिलांनी पूर्ण शक्ती आम आदमी पक्षाच्या मागे उभी करावी असे आवाहन केजरीवालांनी यावेळी केले आहे. या योजनेच्या अंतर्गत शुक्रवारपासून नोंदणी सुरू होणार आहे. तर योजनेच्या अंतर्गत निवडणूक जिंकल्यावर महिलांना हजार रुपयांच्या जागी दर महिन्याला 2100 रुपये मिळू लागतील. महिला स्वत:चे घर चालवत असतात, मुलांना चांगले संस्कार देतात, मुलांना लहानाचे मोठे करतात, या कामात आम्ही त्यांना किंचित मदत करू शकलो तर आम्ही स्वत:ला सुदैवी मानू. हिंदू धर्मानुसार नारीची जेथे पूजा होते, तेथेच देवतांचा वास असतो. या योजनेमुळे दिल्ली सरकारची देखील मोठी प्रगती होईल असे माझे मानणे असल्याचे उद्गार केजरीवाल यांनी काढले आहेत.
अकौंटचा जादूगार आहे मी…
काही लोक ही योजना प्रत्यक्षात येऊच शकत नसल्याचे म्हणत होते. परंतु मी एकदा निर्धार केला की तो पूर्ण करतोच. मग मला कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. दिल्लीत माझ्या दोन कोटी लोकांसोबत मिळून आम्ही मोठ्यातील मोठी अडचण पार करून आमची सर्व कामं करवून घेतो. या योजनेकरता पैसे कुठून येणार अशी विचारणा भाजप नेते करत आहेत. मी जादूगार आहे, मी अकौंटचा जादूगार आहे, पैसे कुठून आणायचे हे मला ठाऊक आहे, असे केजरीवालांनी नमूद केले आहे.
निवडणुकीनंतर वाढणार रक्कम
दिल्ली सरकारने हजार रुपये जमा करण्याचा निर्णय लागू केला असला तरीही निवडणुकीची घोषणा आगामी 10-15 दिवसात होईल. यामुळे सध्या निवडणुकीपूर्वी पैसे खात्यात जमा होणे शक्य नाही. अनेक महिलांनी महागाई वाढल्याचे सांगत हजार रुपये पुरणार नसल्याचे आम्हाला सांगितले होते. यामुळे निवडणुकीनंतर दर महिन्याला 2100 रुपये खात्यात जमा होतील अशी घोषणा करत असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.









