नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; खड्डे खोदलात बुजविणार कधी ? लोकप्रतिनिधी नसल्याने शहराकडे दुर्लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिराजवळ असलेल्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी नळदुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. शहरामध्ये अशा अनेक ठिकाणी नळदुरुस्तीसाठी खड्डे खोदून कामे केली जातात. मात्र दुरुस्ती झाल्यानंतर प्रशासनाकडून खड्डे व्यवस्थितरित्या बुजवले जात नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाचे खड्डे बुजवण्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरातील नागरिकांकडून आणि वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात एखादा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर शहरातील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









