आमदार शिवाजी पाटील यांच्या नावाची करणार मागणी : नगरसेवक रवी साळुंखे यांचा पुढाकार
बेळगाव : सीमा समन्वयकपदी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची निवड करण्यात यावी यासाठी लवकरच म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देऊन मागणी केली जाणार आहे. तत्पूर्वी रवी साळुंखे, समाजसेवक सिद्धार्थ भातकांडे यांनी बुधवार दि. 11 रोजी आमदार शिवाजी पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. नवनिर्वाचित आमदारांचा समस्त बेळगावकरांतर्फे भव्य सत्कार करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले. निमंत्रणाचा स्वीकार करून बेळगावला नक्की येऊ, असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा, अशी मागणी समस्त सीमावासियांतर्फे केली जात आहे. पण, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला गती मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने अन्याय व अत्याचार करत आहे. मध्यंतरी सीमा समन्वयक मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आल्याने सीमावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, त्यांच्याकडून कोणतीच आश्वासक पावले उचलण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सीमावासियांना स्मरून घेतली शपथ
बेळगावच्या सीमेला लागून असलेल्या चंदगड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून शिवाजी पाटील निवडून आल्यानंतर त्यांनी विधानसभेत सीमावासियांना स्मरून शपथ घेतल्याने त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. त्यांना सीमाप्रश्न आणि बेळगावच्या जनतेच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळे त्यांची सीमा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली जाणार आहे. तत्पूर्वी बुधवारी नगरसेवक रवी साळुंखे आणि समाजसेवक सिद्धार्थ भातकांडे यांनी आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्याचबरोबर लवकरच बेळगावात आयोजित केल्या जाणाऱ्या सत्कार समारंभाचेही त्यांना आमंत्रण देण्यात आले.









