कांदा 70, लसूण 400 रुपये किलो
बेळगाव : कडधान्य, डाळी व खाद्यतेलाबरोबर आता कांदा, लसणाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. 30 ते 40 रुपये किलो असणारा कांदा 70 ते 80 रु. झाला आहे. तर 260 रुपये किलो असणारी लसूण तब्बल 400 रुपये किलो झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा-लसणाच्या फोडणीचा चटका सहन करावा लागत आहे. आवक कमी झाल्याने लसणाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणीच्या स्वयंपाकावर परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांपासून डाळी, कडधान्य, खाद्यतेल, किराणा साहित्याच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दैनंदिन आहारात लागणाऱ्या कांदा आणि लसणाचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. आगामी काळात दरातील तेजी कायम राहण्याची शक्यताही व्यापाऱ्यातून वर्तविली जात आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर 70 ते 80 रुपये किलो झाले असून लसूणही 400 ते 450 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.
लसणाचे दर उच्चांकी पातळीवर
मागील वर्षी लसूण उत्पादन जास्त झाले होते. त्यामुळे दर स्थिर होते. सध्या आवक पूर्ण कमी झाल्याने लसूण दर 400 रु. किलोपर्यंत आहेत. लसणाचे वाढलेले दरही उच्चांकी पातळीवर पोहोचले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.









