महिनाभर ग्रामीण भागात जागृती उपक्रम राबविणार
खानापूर : खानापूर पोलिसांकडून गुन्हे प्रतिबंधक महिन्याचे आचरण करण्यात येत आहे. यानिमित्त खानापूर पोलीस ठाण्याच्या शहरासह ग्रामीण भागात चोरी व इतर गुन्ह्यांच्या बाबत जागरूकता बाळगण्यासंदर्भात नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. खानापूर येथील बसस्थानकात बुधवारी खानापूर पोलिसांकडून जागरूकता मोहीम राबविण्यात आली. यावेळी खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम डिसेंबर अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे.खानापूर बसस्थानकात प्रवासात चोरट्यांपासून सावधानता बाळगण्यासंदर्भात कोणती खबरदारी घेण्यात यावी,
याबाबत खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक एम. बी. बिरादार, गुन्हे विभागाचे निरीक्षक सी. एल. बबली, पोलीस हवालदार जे. एल. काद्रोळी, बी. जी. यळीगार यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना चोरट्यांपासून खबरदारी घेण्यासंदर्भात माहिती दिली. तसेच घरातून बाहेर जाताना आजुबाजूच्या शेजाऱ्यांना माहिती देवून जाणे तसेच किंमती ऐवज, सोन्याच्या वस्तू बाहेर जाताना लॉकरमध्ये ठेवून जाणे. जर जास्त दिवस बाहेर जाणार असाल तर याबाबत पोलीस स्थानकात माहिती देणे गरजेचे आहे. चोरटे बंद घर लक्ष करत आहेत. यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत हवी असल्यास 112 या क्रमांकाशी संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.









