कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे 2021-22 या आर्थिक वर्षात 433 कोटी 60 लाख लिटर पेट्रोलची बचत झाली आहे. त्यामुळे तब्बल 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली. ई टेंव्टी म्हणजे 20 टक्के इथेनॉल. आता 20 टक्के मिश्रण सुरू असून यातून सुमारे 10.15 अब्ज लिटर इथेनॉलची आवश्यकता भासणार आहे. इथेनॉल मिश्रणाने साखर उद्योगाला मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. अहवालानुसार, भारतीय इथेनॉल बाजार 2027 पर्यंत सुमारे 40 हजार 593 कोटी रुपये उद्दिष्ट गाठण्याची अपेक्षा आहे.
20 टक्के इथेनॉल तर 80 टक्के पेट्रोल म्हणजे ई : 20 प्रोजेक्ट होय. यापूर्वी ई : 10 इंधनाचा वापर सुरू होता. पेट्रोलियम पदार्थांसाठी आयातीवर अवलंबित्व आणि हवेतील कार्बनसारख्या विषारी घटकाचे प्रमाण कमी करण्यासाठी भारताने जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी जैव इंधनाचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम सुरू केला. फेब्रुवारी 2023 मध्ये पुढील दोन वर्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील प्रमुख शहरांसाठी ई : 20 चे पायलट लॉंच केले. आता याची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे इंधनावरील अवलंबत्व कमी करण्यासह परदेशी चलनाची गंजाजळी वाचवणारे ठरत आहे.
इथेनॉल 20 हे रिफाईंड (शुध्द केलेलं) आणि मिश्रित इंधनाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात आहे. त्यांतर्गत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाईल. इथाईल अल्कोहोल किंवा इथेनॉल हे जैवइंधन आहे. जे नैसर्गिकरित्या साखर आंबवून तयार केले जाते. ते बहुतांशी उसापासून साखर मिळवून मिळवले जाते. यासह धान्यापासून इथेनॉल निर्मिती होते.
सध्या देशात इथेनॉलची उत्पादन क्षमता सुमारे 1037 कोटी लिटर आहे. यामध्ये 700 कोटी लिटर उसापासून तर 337 कोटी लिटर धान्यापासून उत्पादीत केले जाते. 2023-24 मध्ये 698 कोटी लिटर आणि 2024-25 साठी 988 कोटी लिटर इतकी असेल. ई– 20 कार्यक्रमाचा सर्वाधिक फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. इथेनॉलकडे अतिरिक्त उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.
गेल्या आठ वर्षांतील आकडेवारी पाहता इथेनॉल पुरवठादारांनी त्यातून 81 हजार 796 कोटी रुपये कमावले आहेत. तर शेतकऱ्यांना 49 हजार 78 कोटी रुपये मिळाले आहेत. परकीय चलन खर्चात देशाने 53 हजार 894 कोटींची बचत केली. देशातील इंधनाच्या वाढत्या मागणीवर इथेनॉल हेच सद्यस्थितीत उत्तर असून भविष्यात ई : 100 म्हणजेच शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने हेच असेल.
जुन्या गाड्यांना अडचण
ई : 20 इंधनामुळे जुन्या वाहनांच्या इंजिनमध्ये तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. इंजिन जॅम होण्यासह वाहनक्षमतेत फरक पडला आहे. इंजिनमध्ये तांत्रिक सुधारणा करुन ई : 20 साठी उपयुक्त करता येऊ शकतात. ई : 20 वापरत असलेल्या इंधन टाकीमध्ये पाणी जाऊ न देण्याची काळजी वाहनधारकांना घ्यावी लागणार आहे. भारत स्टेज 4 टप्प्यापासून पुढील वाहनांना ई : 20 इंधनाने वाहन क्षमता सुधारल्याचा अनुभव वाहनधारक सांगतात.
इथेनॉल दृष्टीक्षेप
देशाची इथेनॉल गरज : 1037 कोटी लिटर
सध्याचे उत्पादन : 542 कोटी लिटर
महाराष्ट्रात गरज : 60 ते 65 कोटी लिटर
राज्याची उत्पादन क्षमता : 130 कोटी लिटर
परकीय चलनाची बचत : 30 हजार कोटी








