कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
कधीतरी आमावस्या, पौर्णिमा, दसरा, दिवाळीला रिक्षा सजवली, मढवली, हे ठीक आहे. पण सतत सजवलेलीच रिक्षा फिरवत राहणार, काही नवं दिसलं तर लगेच सजावटीत पुन्हा बदल करणे याला हौस, हौस आणि हौसच.. हा शब्द लागू आहे. आणि अशा सजलेल्या रिक्षा कोल्हापुरात डौलाने रोज फिरत आहेत. हौसेला मोल नसतं, याचे वास्तवातले प्रतीक या रिक्षांत दिसते आहे आणि अशा सजावटीला प्रोत्साहित करणारी रौप्यमहोत्सवी रिक्षा सौंदर्य स्पर्धेची तयारी कोल्हापुरात सुरू झाली आहे. एखाद्या ब्युटी क्विन स्पर्धेच्या तयारीसारखे वातावरण केवळ कोल्हापूरच नव्हे तर सांगली, सातारा, कराड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे येथील रिक्षा व्यावसायिक विश्वात तयार झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील रिक्षा व्यवसाय विश्वात कोल्हापूरच्या या रिक्षा सौंदर्य स्पर्धेला मोठा मान आहे. यावर्षी 26 जानेवारीला रौप्यमहोत्सवी रिक्षा सौंदर्य स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेच्यावतीने शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळाने गेली 24 वर्ष या स्पर्धेचे सलग आयोजन केले आहे. कोल्हापुरातल्या रिक्षा व्यवसायाला एक खूप वेगळी अशी परंपरा आहे. साधारण 1965-66 साली कोल्हापुरात पहिल्या पाच रिक्षा आल्या. काही टांगा व्यावसायिकांनीच काळाच्या ओघातला बदल म्हणून ‘घोड्याच्या लगाम’ऐवजी रिक्षाचे स्टेअरिंग हातात घेतले. कोल्हापुरात रिक्षा म्हणजे ती कुटुंबाचा एक घटकच. त्यामुळे रोजच्या रोज रिक्षा चकचकीत ठेवण्यावर रिक्षाचालकांचा भर राहिला. सकाळी उठल्या–उठल्या रिक्षा स्वच्छ करायची. पुजायची, उदबत्ती लावायची व मगच ती व्यवसायासाठी बाहेर काढायची पद्धत न चुकता पाळली गेली.
रिक्षा आमावस्येला हार, फुले घालून पुजायची. नारळ फोडायचा, ही पद्धत तर जणू नियमच झाला. त्यामुळे कोल्हापूरच्या रिक्षा मुळातच स्वच्छ राहिल्या. पण काही रिक्षाचालकांनी रिक्षा सजावटीवरही भर दिला. त्यामुळे रिक्षाचे कुशन, टपावर नक्षीदार लोगो, काचेवर रेडियमची सजावट, रिक्षाच्या मागे आकर्षक नाव, सुविचार, रिक्षाच्या आरशाला फडफडणारा पिवळा नॅपकिन, हँडलवर देवाची लहान मूर्ती, टेपरेकॉर्डर, मागच्या सीटवर मंद लाईट ही तर कॉमन सजावट झालीच. पण त्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या सजावटीच्या वस्तू रिक्षा सजवण्यासाठी वापरल्या जाऊ लागल्या. त्यात लक्षवेधी हॉर्न, लहानसा फॅन, वाय–फाय, बाह्य सजावटीसाठी अतिशय सुंदर अँटिक पितळी मुर्तींचा वापर होऊ लागला व रिक्षांचा चेहरामोहराच बदलला. हौसेला मोल नसते, याची प्रचिती यानिमित्ताने दिसू लागली. एकेका रिक्षावर केवळ सजावटीसाठी केलेल्या खर्चाची आकडेवारी लाखांवर जाऊन पोहोचली. खऱ्या अर्थाने त्यामुळे रिक्षा ‘लाख’मोलाची झाली. पण सजवलेली रिक्षा केवळ शोसाठी दारात किंवा चौकात थांबून न ठेवता ती प्रवासी वाहतुकीसाठीही नियमित वापरली जाऊ लागली.
रिक्षाचालकांचे रिक्षावर असलेले हे प्रेम, सजावटीसाठी सुरू असलेली धडपड पाहून निवृत्ती चौक तरुण मंडळाने 24 वर्षांपूर्वी एक स्पर्धा जाहीर केली व सजवलेल्या रिक्षांची रांगच स्पर्धेसाठी निवृत्ती चौकात लागली. पुढे–पुढे या स्पर्धेची चर्चा सांगली, सातारा, कराड, पुणे, बेळगावपर्यंत जाऊन पोहोचली व तेथून अशा स्पर्धेसाठी रिक्षा येण्यास सुरुवात झाली. 26 जानेवारी ही रिक्षा सौंदर्य स्पर्धेची तारीखच ठरून गेली. काही वर्षांपूर्वी तर बेळगावच्या दोन रिक्षांनी या स्पर्धेची ट्रॉफी पटकावली.
यावर्षी या स्पर्धेचे 26 जानेवारीला रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. लाख–दीड लाखांची बक्षिसे आहेत. स्पर्धेचा सांगावा प्रत्येक रिक्षा स्टॉपवर न चुकता पोहोचला आहे. आणि या मानाच्या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. आपण आपली रिक्षा कशी सजवणार, हे इतरांना समजू न देण्याचे गुपित हे या स्पर्धेचे वेगळे वैशिष्ट्या आहे. पारितोषिक मिळू दे अथवा राहू दे. पण स्पर्धेत प्रत्येक रिक्षाची होणारी दमदार एन्ट्री हा देखील आकर्षणाचा कायम विषय ठरला आहे. आणि हा क्षण रिक्षा व्यावसायिकांना आणखी बळ देतो आहे. ‘मी रिक्षावाला’ ही पट्टी त्यामुळेच प्रत्येक रिक्षावाला आपल्या छातीवर अभिमानाने मिरवतो आहे.
सजावटीची स्पर्धा हा आनंदांचा सोहळा
उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रिक्षा जरूर आमचा आधार आहे. पण रिक्षा आमच्या जीवनाचा एक घटकही आहे. त्या रिक्षावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही रिक्षा सजवतो आणि त्या सजावटीची स्पर्धा म्हणजे आमच्यादृष्टीने एक आनंदाचा सोहळाच असतो.
राजू जाधव, सौंदर्य स्पर्धा संयोजक








