मंड्या जिल्ह्याच्या सोमनहळ्ळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे मंगळवारी पहाटे बेंगळूरमधील निवासस्थानी निधन झाले होते. बुधवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर मंड्या जिल्ह्याच्या सोलदेवनहळ्ळी येथील ‘कॅफे कॉफी डे’च्या आवारात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे पार्थिव मंगळवारी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बुधवारी बेंगळूरपासून सोमनहळ्ळीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. बेंगळूरच्या टाऊन हॉल, म्हैसूर सर्कल, राजराजेश्वरी गेट, केंगेरी, बिडदी, रामनगर, चन्नपट्टणमार्गे पार्थिव सोमनहळ्ळी येथे आणण्यात आले. या मार्गावर अनेकांनी पुष्पवृष्टी करून कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
एस. एम. कृष्णा यांचे नातू व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे जावई अमर्त्य हेगडे यांनी चितेला अग्नी दिला. अंत्यविधीसाठी वनखात्याने चंदनाच्या लाकडांचा पुरवठा केला होता. एस. एम. कृष्णा यांच्या अंत्यसंस्कारावेळी आदीचुंचनगिरी मठाचे निर्मलानंदनाथ स्वामीजी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र तसेच सरकारमधील अनेक मंत्री, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मरणोत्तर ‘कर्नाटक रत्न’ द्या : आर. अशोक
माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी राज्य सरकारने मरणोत्तर ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली. कृष्णा यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची सरकारने दखल घ्यावी. त्यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार देऊन सन्मान करणे योग्य ठरेल, असे माझे मत आहे, असेही आर. अशोक यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट अपलोड केली आहे.









