दागिने काढून घेत निर्जनस्थळी दिले सोडून : शहापूर पोलिसात गुन्हा दाखल
बेळगाव : आनंदनगर वडगाव येथून मायलेकाचे वाहनात कोंबून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवार दि. 8 रोजी ही घटना घडली असून अपहरणकर्त्यांनी महिलेच्या गळ्dयातील मंगळसूत्र आणि कर्णफुले हिसकावून घेत मायलेकांना एका निर्जनस्थळी सोडून देऊन पलायन केले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गंगव्वा संतोष तपली (मूळ रा. नेलगंटी ता. गोकाक, सध्या रा. वडगाव रेणुका हॉटेलनजीक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघा अज्ञात अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजेली अधिक माहिती अशी, फिर्यादी गंगव्वा या आपल्या मुलासमवेत वडगाव येथील रेणुका हॉटेलनजीक भाडोत्री घरात राहतात. रविवारी आपला मुलगा मल्लाप्पाला सोबत घेऊन घराचे भाडे देण्यासाठी म्हणून आनंदनगर वडगाव येथे राहणाऱ्या मालकांकडे जात होत्या. आनंदनगरकडे जात असताना वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी गंगव्वा यांच्या गळ्dयातील मंगळसूत्र आणि कर्णफुले हिसकावून घेत मायलेकाना एका निर्जनस्थळी सोडून देऊन पलायन केले. अपहृत महिलेने शहापूर पोलीस ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली. पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पोलिसांनी चौघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी बेळगावात दाखल झाला आहे. त्यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असतानाच अशा प्रकारची अपहरणाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. मात्र, त्यावर नियंत्रण आणण्यात पोलीस खात्याला अपयश येत असल्याने गुन्हेगारीत वाढ होत चालली असल्याचा आरोप केला जात आहे. वारंवार घडणाऱ्या चोऱ्या, खून, दरोडे, लूटमारीच्या घटनांमुळे लोकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









