कोल्हापूर / सुधाकर काशीद :
गोकुळ शिरगावजवळ एक जुना नाका अगदी काही दिवसापर्यंत होता. मुख्य रस्त्याच्या कडेलाच काढलेला एक फाटा त्या नाक्यावरून पुढे जात होता. त्या नाक्याकडे प्रत्येक ट्रक वळवायलाच लागायचा. ट्रक नाक्याजवळ आला की क्लिनर मंद गतीने चाललेल्या त्या ट्रकमधून उडी मारत उतरायचा. हातात ट्रकच्या कागदपत्रांची भेंडोळी असायची. भेंडोळीत काहीतरी असायचे, तो लुंगी सावरत, धावतच नाक्याच्या केबिनकडे जायचा. केवळ मिनिटात त्याची ‘तपासणी’ पूर्ण व्हायची. नाक्यावरचे कर्मचारीही असायचे. पण खासगी पंटरही त्यांच्या जोडीला असायचे. ते कायम ‘चहापेक्षा किटली गरम’ अशा रुबाबात वावरायचे. ते त्यांचे काम ‘निष्ठेने’ करायचे. नाक्यावरचे विशेषत: केरळ, कर्नाटक, तामिळनाडू पासिंगचे ट्रक येथे थांबूनच पुढे निघून जायचे. नाक्यावरच्या तपासणीचे हे काम पुढे 24 तास चालू रहायचे.
त्या नाक्यावर ड्युटीसाठी अनेक जण उत्सुक असायचे. ते ड्युटी मिळणे म्हणजे संधी असायची आणि ही संधी व्यवस्थित घेतली जायची. अनेकवेळा या नाक्याची चर्चा व्हायची. महामार्गावरची ‘वाटमारी’ अशी टीकाही व्हायची. अँटी करप्शनची नजरही त्यावर असायची. पण कधी कारवाई नसायची. हा नाका खूप गाजला तो जरूर आवश्यक होता. महसूल, दळणवळण, मालवाहतुकीच्या सुसुत्रीकरणासाठी तो आवश्यकही होता. पण लोकांचा या नाक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कधीच समाधानकारक नव्हता. तिरक्या नजरेनेच या नाक्याकडे बघण्याचा पायंडा तेथील कामकाजामुळे पडला होता, हा नाका कायम चर्चेत राहिला. वादग्रस्तही ठरला. बातम्यांचे विषय ठरला.
तिथले कर्मचारी आणि त्यांच्यासोबतचे पंटर तर हा तर वेगळाच विषय झाला. हे पंटर पण, त्यांचा त्या खात्याशी काही संबंध नसायचा. पण नाक्यावर जणू त्यांचेच नियंत्रण असल्यासारखे वातावरण करायचे. त्यांना ‘चहापेक्षा किटली गरम’ असे नाव पडले होते. ते नाक्यावरचे काम ‘मनापासून’ करायचे. शासनाला जणू ते आपली सेवा मोफत दिली, असे दाखवायचे. ट्रकची कागदपत्रे ते दोन–तीन सेकंदांत तपासतात कशी, हे कोडेच असायचे. विशेष हे की जगात सगळीकडे सीसीटीव्ही. पण येथे त्या सीसीटीव्हीचे अँगल जेथे हवे तेथे नसायचे. वजनकाटा तर नेहमी बंदच असायचा. तरीही हा नाका पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आपली अखंड सेवा देत राहिला.
आता तो नव्या इमारतीत आहे, नाक्याचे कामकाज म्हणे, पूर्ण पारदर्शक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे 360 अंशांत आहेत. आता पण पंटर असणार का? असले तर कोठे असणार, ते त्यांचे काम कसे करणार, ही एक शंकाच आहे. पण पंटर नसले तर तो एक वेगळाच क्षण असणार आहे. पण जुना नाका व तिथले क्षण, आठवणी मात्र ट्रक व्यावसायिकांच्या डोक्यात आणखी काही वर्षे फिट्ट असणार आहेत.
नाका आधुनिक अन् संगणकीकृत
नवीन नाक्यावरचे सर्व कामकाज पारदर्शी आहे. जीएसटी, सेंट्रल एक्साईज, आरटीओचे तेथे विभाग आहेत. प्रत्येक व्यवहाराची रिसीट आहे. वाहनचालकाला तेथे चांगली सेवा मिळणार आहे. नाका आधुनिक व संगणकीकृत आहे.
संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी
नव्या नाक्यालाही विरोधच
नाका म्हटलं, की तिथे काहीतरी द्यावेच लागते, असा समज आजही आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण नाक्यावर येणारे अनुभव विचित्र आहेत. ट्रकचालकाला पिळून काढले जाते. ट्रक व्यावसायिक हतबल झाला आहे. त्यामुळे या नव्या खासगी नाक्यालाही महाराष्ट्रातील ट्रक व्यावसायिकांचा विरोध आहे.
सुभाष जाधव अध्यक्ष, केल्हापूर लॉरी असोसिएशन








