वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अफगाण क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटला अफगाण क्रिकेट मंडळाने मुदत वाढ दिली आहे. ट्रॉट आता 2025 अखेर प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील.
पुढील वर्षी पाकमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा होत असल्याने अफगाण क्रिकेट मंडळाने इंग्लंडचे 43 वर्षीय जोनाथन ट्रॉटला एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 च्या जुलैपासून ट्रॉट अफगाण क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. ट्रॉटच्या मार्गदर्शनाखाली अफगाण क्रिकेट संघाची कामगिरी गेल्या काही कालावधीत सातत्याने चांगली होत आहे. अफगाण क्रिकेट संघाने आयसीसीच्या टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. तर या स्पर्धेत त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांना पराभूत केले. गेल्या वर्षी भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही अफगाणने बलाढ्या इंग्लंड, पाकिस्तान आणि लंका यांना पराभवाचे धक्के दिले होते. या कामगिरीमुळे अफगाण संघाला पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. अफगाणने अलिकडेच द. आफ्रिका तसेच बांगलादेश विरुद्धची द्विपक्षीय वनडे मालिकाही जिंकली आहे. ट्रॉट यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणने 34 वनडे सामने खेळले असून त्यापैकी 14 सामने जिंकले आहेत. तर 44 टी-20 सामन्यांपैकी 20 सामने जिंकले आहेत. सध्या अफगाणचा संघ झिम्बाम्वेच्या दौऱ्यावर विविध मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे.









