अध्याय पाचवा
कर्ममार्ग आणि संन्यासमार्ग हे एकाच रस्त्याचे दोन भाग आहेत. रस्त्याच्या कर्ममार्गाचा भाग पूर्णतया चालून संपवला की, साधक त्याच रस्त्याच्या पुढील भागातून म्हणजे संन्यासमार्गावरून पुढे चालू लागतो. ह्या मार्गाचा शेवट मोक्षप्राप्तीत होतो. मोक्षावस्थेत आत्म्याचे परमात्म्याशी मिलन हे ठेवलेलेच असते. म्हणून ज्याला आत्म्याचे परमात्म्याशी मिलन हा उत्तम योग साधण्याची इच्छा आहे त्याने कर्मयोगाच्या आचरणापासून सुरवात करावी म्हणजे आपोआपच त्याचे कर्म करून फलत्याग करणाऱ्या संन्याशात रुपांतर होते. कर्मयोग आचरणारा संन्यास मार्गाचे आचरण करणाऱ्यापेक्षा प्रशंसनीय आहे ह्या अर्थाचा
श्रौतस्मार्तानि कर्माणि फलं नेच्छन्समाचरेत् ।
शस्तऽ स योगी राजेन्द्र अक्रियाद्योगमाश्रितात् ।। 1 ।।
हा ह्या अध्यायाचा पहिला श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार, श्रौत व स्मार्त ही दोन्ही प्रकारची कर्मे निरपेक्षतेने करावीत. बाप्पांच्या सांगण्याप्रमाणे जो साधक निरपेक्षतेने कर्मे करण्यास सुरवात करेल त्याची मोक्षाच्या दिशेने वाटचालीला सुरवात होते. मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी जे लोक चांगली कामे करतात ते स्वार्थी प्रवृत्तीचे असतात तर ईश्वरप्राप्तीसाठी जे लोक निरपेक्षतेनं कर्म करतात ते योग प्रवृत्तीचे होत. काही अपवाद वगळता बहुतेक माणसांचा मूळ स्वभाव स्वार्थी असतो. त्यामुळे सुरवातीला सर्वजण स्वार्थ साधण्यासाठीच चांगली कर्मे करत असतात.
चांगली कर्मे करत असल्याने हळूहळू माणसाचं चित्त शुद्ध होत जातं. त्यामुळे आपण कर्मयोगाचे आचरण करावे असे त्याला वाटू लागते. साधक कर्मे करून ती ईश्वरार्पण बुद्धीने करू लागला की, योगी होतो. त्याच्या आत्म्याची ईश्वराशी मिलन होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू होते.
संन्यास म्हणजे काहीही काम न करता आराम करायचा असा सामान्य माणसाचा समज असतो. परंतु कर्म टाळणे ही बाब कुणालाही शक्य नसल्याने सर्व कर्मांचा त्याग करणं म्हणजे संन्यास ही चुकीची धारणा आहे. त्यामागे शारीरिक कष्ट टाळण्याचा विचार असतो. ह्या विचारामुळे मनुष्य आळशी होतो. त्यामुळे तमोगुण वाढीस लागून शेवटी त्याची अधोगती होते. थोडक्यात कर्मे टाळून खरा संन्यास सिद्ध होत नाही. त्याउलट वाट्याला आलेली कर्मे निरपेक्षतेनं करून फळाची अपेक्षा न करणारा खरा संन्यासी होतो. म्हणून आपण कर्मयोग आचरावा असे ज्याला वाटू लागते तेथेच त्याचा उद्धार लवकर होणार असे निश्चित होते. म्हणून बाप्पा म्हणतात, कर्मयोगी हा संन्यासी व्यक्तीपेक्षा प्रशंसनीय आहे. पुढील श्लोकात बाप्पा सांगतात, कर्मयोगात विशेष प्रगती करण्यासाठी शमदम उपयोगी पडतात.
योगप्राप्त्यै महाबाहो हेतुऽ कर्मैव मे मतम् ।
सिद्धियोगस्य संसिद्ध्यै हेतू शमदमौ मतौ ।।2।।
अर्थ- हे महाबाहो, योगप्राप्तीला कारण कर्मच आहे असे माझे मत आहे. सिद्धियोगाची सिद्धि होण्याला कारण शम आणि दम आहेत असे मानले आहे.
विवरण- बाप्पा म्हणतात, जो वाट्याला आलेलं कर्म निरपेक्षतेने करतो त्यालाच योगप्राप्ती होते. योगप्राप्ती म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होय. ते होण्यासाठी मन निर्विचार असणे आवश्यक आहे.
कर्मयोगी निरपेक्षतेनं कर्मे करत असल्याने मी अमुक कर्म केलं की, मला तमुक फळ मिळेल त्यामुळे मला अमुक प्रकारचं सुख मिळेल, मग मी ते आणखीन मिळवायचा प्रयत्न करीन असे विचार त्याच्या मनात येत नाहीत. अपेक्षित सुख मिळाले नाही म्हणून दु:खही वाटत नाही. नाहीतरी माणसाला अपेक्षेबरहुकूम सगळं मिळालंय असं कधी घडत नाही कारण मनुष्य मूळचाच असमाधानी प्रवृत्तीचा असतो पण निरपेक्ष असल्याने कर्मयोग्याच्या बाबतीत पुढील सर्व अनर्थ टळतो.
क्रमश:








