कोल्हापूर :
राज्यातील जिल्हा परिषद शाळामध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधून विज्ञान व भाषा या विषयाचे पदवीधर पदोन्नती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांच्या शिष्टमंडळाने पुणे सहाय्यक शिक्षण आयुक्तांना निवेदन दिले होते. या निवेदनाचा विचार करून पदवीधर शिक्षकांना लवकरच पदोन्नती देणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे, अशी माहिती राजाराम वरूटे यांनी पत्रकाव्दारे दिली.
पत्रकात म्हंटले आहे, पुणे सहाय्यक शिक्षण आयुक्त राम पंदारे यांना निवेदन देवून चर्चा केली होती. त्यानुसार शिक्षण संचालकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये पदवीधर पदोन्नती विज्ञान विषयाचे 48 आणि भाषा विषयाचे 176 या शिक्षकांची पदोन्नती केली जाणार आहे. तर समाजाशास्त्र विषयाचे शिक्षक अतिरिक्त असल्याने या विषयाच्या जागा भरल्या जाणार नाहीत. पवित्र पोर्टलमधून जागा भरण्याअगोदर पदवीधर शिक्षकांची पदोन्नती करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी जिल्हा परिषदेला कार्यरत शिक्षकांची पदोन्नती करून उर्वरीत जागा राज्य शासनाला कळवण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुणे शिक्षण आयुक्तांना निवेदन देताना राजाराम वरूटे, संभाजी बापट, बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, मारूती दिंडे आदी उपस्थित होते.








