कोल्हापूर :
प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने येथील कामकाजावर परिणाम होत आहे. आठ दिवस हा प्रकार सुरू असून सर्वाधिक फटका परवाना विभागाला बसत आहे. येथील दैनंदिन दाखल होणारे परवाना फॉर्म अपलोड होऊ शकलेले नाही. वाहनधारकांवर फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.
राज्यातील सर्व आरटीओ ऑफीसमध्ये ऑनलाईन कामकाज चालते. एनआयसीच्या (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) अंतर्गत ही सर्व कामे केली जातात. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन सिस्टीममध्ये अडथळे येत आहेत. सर्व्हर डाऊनची समस्या तर कायम स्वरूप ठरलेली आहे. आठ दिवसांपासून आरटीओ ऑफीसमधील सर्व्हर डाऊन होत आहे. यामुळे कच्चा परवाना, पक्का परवानाचे फॉर्म अपलोड होऊ शकलेले नाहीत. परिणामी वाहनधारकांसह आरटीओ ऑफीसमधील कर्मचाऱ्यांनाही सर्व्हर डाऊनचा त्रास होत आहे.
कामकाज गतीने नाहीच, अडथळेच जास्त
शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील नागरिकांची कामे गतीने व्हावीत. कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत म्हणून शासनाने ऑनलाईन सिस्टीम सुरू केली. परंतू कामकाज गतीने नाहीच, अडथळे मात्र, येत आहेत.
सर्व्हरची क्षमता वाढविणे आवश्यक
एनआयसीने सध्याचे सर्व्हरची क्षमता वाढविणे किंवा प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र सर्व्हर देणे आवश्यक आहे. आरटीओ ऑफीसप्रमाणे महापालिकेतील जन्म–मृत्यू दाखला विभागातील कामकाजावरही सर्व्हर डाऊनमुळे परिणाम होत आहे.








