फोटो सोशल मीडियावर व्हायर झाल्याने एकच चर्चा
बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुवर्णविधानसौध मार्गावरील हलग्याजवळ राष्ट्रीय महामार्गालगतचा सेवा रस्ता रोखून धरत शेतकऱ्यांनी सोमवार दि. 9 रोजी तीव्र आंदोलन केले. यावेळी परिवहन खात्याच्या दोन बस आंदोलनस्थळावरून पुढे गेल्याने शेतकऱ्यांनी सदर बसचा पाठलाग करत बस अडविल्या. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी बसचालकांचे हात हिरव्या टॉवेलने बांधून घातले. चालकांचे टॉवेलने हात बांधलेले फोटो सोशल मीडियावर व्हायर झाल्याने या प्रकाराची सोमवारी दिवसभर एकच चर्चा सुरू होती. किमान आधारभूत किंमत, उसाला योग्य भाव निश्चित करणे, शेतकरी विरोधी कायदे मागे घेणे, कळसा भांडुरा योजनेसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसह राज्य शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रास्तारोको आंदोलन केले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हलगानजीक काहीवेळ वाहतुकीची केंडी झाली होती. यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. रास्तारोको आंदोलनामुळे सेवारस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावरून ये-जा करणारी वाहने थांबली असताना परिवहनच्या दोन बसेस पुढे रेटण्यात आल्या. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बसेसचा पाठलाग करून बस अडविल्या. शेतकऱ्यांनी बसमध्ये प्रवेश करून चालकांचे हिरव्या टॉवेलने हात बांधले. तसेच बसच्या स्टेरिंगलाही टॉवेल बांधत शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बसचालकांचे हात बांधलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची चर्चा सर्वत्र होत आहे.









