कोल्हापूर :
कागल येथील नवीन सीमा तपासणी नाका अदानी गुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. नाका सुरू करण्याची आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यानी सोमवारी दुपारी नाक्याला भेट दिली. मंगळवारी प्रादेशिक परिवहन अधिक्रायांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता हा नाका सुरू होणार आहे. यासाठी तपासणी नाका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथील नवीन सिमा तपासणी नाका विविध कारणांनी वादात सापडला आहे. नाक्याच्या बांधकामाची रक्कम न मिळाल्याने पुण्यातील बांधकाम व्यासायिकाने न्यायालयात धाव घेऊन हा नाका सुरू करण्याला न्यायालयातून स्टे ऑर्डर आणली होती. तसेच कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनसह महाराष्ट्र लॉरी असोसिएशनने आंदोलन करत नाका सुरू करण्याला विरोध केला होता. या आंदोलनात नाक्याच्या कामात जमिनी गेलेल्या शेतक्रयांनीही पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला होता. दरम्यानच्या काळात नाका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याला फारसे यश आले नाही. मात्र विधानसभा निवडणूकीनंतर नाका सुरू करण्याच्या हालचाली गतीमान करण्यात आल्या.
नाका सुरू करण्याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनने कागल पोलिस ठाण्यापासून जिल्हा प्रशासनापर्यंत निवेदने दिली होती. तसेच बैठकाही घेण्यात आल्या होत्या. यातून तोडगा न निघाल्याने लॉरी असोसिएशनने सोमवारी नाक्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाने रविवारी रात्रीपासून प्रमुख आंदोलकांना स्थानबध्द केले आहे. तसेच नाका सुरू करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात केला आहे. त्यामुळे नाक्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे . मात्र काही तांत्रीक बाबींमुळे सोमवारी हा नाका सुरू होऊ शकला नाही. ही तांत्रिक बाब पूर्ण करण्यासाठी आरटीओ विभागातील काही अधिक्रायांनी दुपारी नाक्याला भेट दिली. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजता नाका सुरू केला जाणार आहे. त्याकरिता नाका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.








