कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. आता लवकरच मंत्रिमंडळाची घोषणा होईल. कॅबिनेट आणि राज्यमंत्रीसह पालकमंत्री होण्यासाठी भाजप, शिवसेना आणि जनसुराज्यशक्ती पक्षात चुरस लागली आहे. मंत्रीपद नसेल तर तगडे महामंडळ मिळावे, यासाठी शिंदे–फडणवीस समर्थक अशा सर्वच आमदारांना आस लागली आहे. निवडणुकीनंतर प्रशासकीय उतरंडही बदलणार असल्याने बदलीसाठी पॉलिटीकल गॉडफादरमार्फत फिल्डींग लावली जात आहे.
अडीच वर्षात होते मोठे वेटिंग
20 जून 2022 रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाले. 21 जूनला एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतमध्ये दाखल झाले. आठवड्याच्या गुवाहाटी मुक्कामानंतर शिंदे थेट मुंबईच्या राजभवनावर दाखल झाले. तेथे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. 4 जुलै रोजी 164 विरुध्द 99 मतांनी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर तब्बल 45 दिवस शिंदे आणि फडणवीस असा दोघांनीच मंत्रिमंडळाचा कारभार हाकला. अखेर 9 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार झाला. दोन्हीकडील प्रत्येकी नऊ अशा 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्याकडे 10 तर फडणवीस यांच्याकडे 6 खात्यांचा पदभार आला.
पुन्हा मोठ्या प्रतिक्षेनंतर 24 सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिह्यांची जबाबदारी होती. त्यानंतरही शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, ही इच्छुकांची अपेक्षाही फोल ठरली. अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर निवडणुका होईपर्यंत इच्छुक वेटिंगवरच राहिले. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातच मंत्रिपद मिळावे, राजकारणात आजचा दिवस महत्वाचा असतो. उद्या उजडत नाही, त्यामुळे अभी नही तो कभी नही, या उद्देशाने इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.
नुसतं मंत्रिपद नको पालकही व्हायचंय
जिह्यात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशी संधी मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय महत्व पाहता, यामध्ये अजून एक मंत्रिपद वाढू शकते. तसेच किमान दोघांची ताकदीचे महामंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी शासनकाळात कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी काँग्रेस–राष्ट्रवादीत चढाओढ लागली होती. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आमदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील दोघांनीही राजकीय ताकद लावली होती. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर सतेज पाटील यांनी पक्षांतर्गत हितसंबंधांचा वापर करत ही शर्यत जिंकली होती. आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपदासह होमपिचवर पालकमंत्रीपदाचा मान मिळतो का, हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.
मंत्रिपदाचे दावेदार आणि कारणे
आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने भाजपचा मित्रपक्ष म्हणून जिह्यात राजकीय ताकद दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची खास ओळख आहे. मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदासह जिह्याचे पालकमंत्री म्हणून विनय कोरे यांना पदभार मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठीराखे आणि ज्येष्ठतेच्या मुद्यावर आमदार हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय गुरू मानत त्यांच्याशी एकनिष्ठ असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रीपदासह पालकमंत्रीपदासाठी फिल्डींग लावली आहे. तीसऱ्यांदा आमदार झालेले प्रकाश आबिटकर यांच्या मंत्रिपदासाठी माजी खासदार प्रा. संजय मंडलिक मुंबईत तळ ठोकून आहेत. निवडणूक प्रचारात एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना मंत्री करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते.
बदल्यांची चर्चा आणि फिल्डींग
फडणवीस सरकार भक्कम आणि स्थिर आहे. कोल्हापुरातून मोक्याच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणाहून कोल्हापुरात येण्याची इच्छा असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच वर्षात अस्थिर सरकार होते आणि सहपक्षांच्या सत्ताकारणात कोणाकडे फिल्डींग लावायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडत होता. आता तीन डीवायएसपी, चार उपजिल्हाधिकारी, अर्धा डझन तहसिलदार, डझनभर पोलीस अधिकारी यांच्यासह सर्वच विभागातील वर्ग एक आणि दोनचे अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. अनेकांनी पॉलिटीकल गॉडफादरमार्फत फिल्डींग लावली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आणि महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दुसऱ्या फळीतील बदल्यांच्या फायली पुढे सरकतील. त्यामुळे इच्छीत स्थळ मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना मुंबईचे वेध लागले आहेत.








