ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम : महालक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
वार्ताहर/नंदगड
येथील बाजारपेठेत दुकानासमोर बऱ्याच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले होते. यात्रेचे निमित्त साधून ग्रा. पं. च्यावतीने जेसीबीद्वारे शनिवारी अतिक्रमण हटविले. या कार्यवाहीमुळे नंदगड गावातून ग्रामपंचायतीचे अभिनंदन होत आहे. नंदगड बाजारपेठेत दोन्ही बाजूच्या दुकानदारानी आपल्या दुकानातील साहित्य ग्राहकांना दिसावे म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटारीवर अतिक्रमण करून बांधकाम केले होते. यामुळे दुकानाचा आकार मोठा झाला होता. दुकानदारानी बाजारपेठेत अतिक्रमण केल्याने चारचाकी मोठी वाहने जाणे कठीण झाले होते. बऱ्याच वेळा रहदारीला अडचण निर्माण होत होता. गेल्या काही वर्षापासून अतिक्रमण सुरुच होते. बाजारपेठेतील अतिक्रमण हटवावे म्हणून ग्रामस्थांकडून वारंवार ग्रा. पं. कडे विनंती करण्यात येत होती. परंतु याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
नंदगड गावची ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा 12 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने गावातील ठिकठिकाणी डागडुजीची कामे सुरू आहेत. शिवाय लक्ष्मी देवीची मूर्ती बाजारपेठेतून फिरविण्यात येणार आहे. त्यासाठी मुबलक रुंदीची गरज होती. या सर्वांचा विचार करुन नंदगड ग्रा. पं. ने अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना, दुकानदाराना वेळोवेळी तीन नोटिसा दिल्या होत्या. तरीही दुकानदाराकडून अतिक्रमण हटविण्यात आले नव्हते. ग्रा. पं. ने शनिवारी अचानकपणे जेसीबीद्वारे अतिक्रमण हटविण्यात सुरुवात केल्याने दुकानदारांची मोठी पंचायत झाली. दुकानासमोर विटा, माती पडली.
ग्रामस्थांतून समाधान
गेल्या दोन दिवसापासून सदरचे साहित्य दुकानासमोर पडून राहिल्याने रहदारीत अडथळा निर्माण झाला आहे. परंतु कित्येक वर्षापासून असलेले अतिक्रमण हटविले गेल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अतिक्रमण हटविताना ग्रा. पं. अध्यक्ष, सर्व सदस्य, पीडीओ व कर्मचारी उपस्थित होते.









