नवी दिल्ली :
सलग आठ आठवडे घसरणीत राहिलेल्या विदेशी चलन साठ्याने पुन्हा भरारी घेण्यास सुरुवात केली आहे. भारतासोबत पाकिस्तानच्या चलन साठ्यात वाढ झालेली आहे. 29 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी चलन साठा 1.51 अब्ज डॉलर्सने वाढून 658.091 अब्ज डॉलर्सवर पोहचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. गेले 8 आठवडे हा चलन साठा घसरणीत होता. एक लक्षात घ्या की 27 सप्टेंबरच्या आठवड्यात विदेशी चलन साठ्याने 704.885 अब्ज डॉलर्सचा विक्रमी स्तर पार केला होता. दुसरीकडे देशाच्या सुवर्ण साठ्यात मात्र सदरच्या आठवड्यात घसरण झालेली दिसली आहे. 29 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात 595 दशलक्ष डॉलर्सने कमी होत 66.979 अब्ज डॉलर्सवर स्थिरावला आहे.









