म. ए. समितीची शरद पवार यांच्याकडे मागणी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला अनेक कारणांमुळे रखडला जात आहे. या खटल्याला गती देण्यासाठी लवकर तारखा मिळाव्यात, तसेच अॅड. हरिश साळवे हे खटल्यावेळी उपस्थित राहतील, यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावेत, यासाठी आपण मध्यस्थी करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली. शरद पवार रविवारी कोल्हापूर भेटीवर असल्याने म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाला बळ देण्याची मागणी केली. महामेळावा होऊ नये, यासाठी कर्नाटक सरकारकडून कशा पद्धतीने दबाव घातला जात आहे, याची जाणीवही शरद पवार यांना करून देण्यात आली. त्याचबरोबर इतर प्रश्नांबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व सीमाप्रश्नाचे अभ्यासक दिनेश ओऊळकर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा
सीमाप्रश्नाच्या खटल्याला महाराष्ट्र सरकारकडून प्राधान्य दिले जात नसल्याने हा खटला मागील अनेक दिवसांपासून रखडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याविषयी जातीनिशी लक्ष द्यावे, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सीमावासियांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.









