ग्रामदैवत सातेरी भगवती देवस्थान
ओटवणे प्रतिनिधी
सरमळे गावचे ग्रामदैवत सातेरी भगवती देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी ९ डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी सातेरी भगवतीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी भगवतीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि सरमळे ग्रामस्थांनी केले आहे.









