कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बंद झालेल्या अभ्यासक्रमाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी संबंधित विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे जुने कोड काढून नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन कोड देणे अभ्यास मंडळाकडून आवश्यक होते. कारण एसआरपीडीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवणे, परीक्षेचे गुण ऑनलाईन फिड करणे सोयीचे होते. परंतू अभ्यासमंडळाकडून विषयांच्या प्रश्नपत्रिकांना नवीन कोड न दिल्याने परीक्षा विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवाजी विद्यापीठातील जुने अभ्यासक्रम बंद झाले असतील तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांची नव्याने निर्मिती करून त्यानुसार अभ्यासक्रम तयार करावे लागतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणे अनिवार्य आहे. शिवाजी विद्यापीठातील काही अभ्यासक्रमाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षा देण्याची संधी दिली आहे, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. परंतू शिवाजी विद्यापीठातील संबंधीत विषयाच्या अभ्यास मंडळाने त्या त्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांचे जुने कोड काढून नवीन कोड दिलेले नाहीत. परिणामी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांवर शनिवारी दिवसभर बसून अभ्यास मंडळांच्या चुका सुधारण्याची वेळ आली.
एसआरपीडीच्या माध्यमातून जुन्या कोडची प्रश्नपत्रिकाच जात नाही, त्यामुळे संबंधीत विषयांना नवीन कोड देण्याशिवाय परीक्षा विभागासमोर पर्याय नव्हता. विद्यापीठातील अंतर्गत कामाची माहिती विद्यार्थ्यांना नसल्याने परीक्षा विभागानेच चुकीची प्रश्नपत्रिका दिली, वेळेत प्रश्नपत्रिका आली नाही, यासह अन्य प्रश्नांना तोंड परीक्षा विभागालाच द्यावे लागते. त्यामुळे परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी दिवसभर अभ्यासक्रमाचे समांतर कोड बदलण्याचे काम केले. किमान पुढच्या परीक्षेला तरी अभ्यास मंडळाने नवीन कोड द्यावेत, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
वारंवार वेळापत्रकात बदल करून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
परीक्षेच्या वेळापत्रकात वारंवार बदल केल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पेपर आहे, म्हणून अभ्यास करायला घेतला की पुन्हा वेळापत्रक बदलल्याचा एसएमएस येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषय संभ्रम निर्माण झाला आहे.








