कोल्हापूर :
सौंदत्ती डोंगरावर 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत साजरी होत असलेल्या रेणुकादेवीच्या यात्रेसाठी कोल्हापुरातून रेणुकादेवीचे टाक असलेले चार मानाचे जग शनिवारी बिंदू चौकातून डोंगराकडे रवाना झाले. शिवाजी पेठ, फिरंगाई तालीम मंडळाजवळील प्रकाश मिठारी, हेमंत जाधव व योगराज जाधव यांची मानाची सासनकाठीसुद्धा जगांसोबत सौंदत्तीकडे नेण्यात आली आहे. मार्गात उदं ग आई उदंचा अखंड गजर करत जगांवर भंडाराची उधळण करण्यात आली. सासनकाठीवरही भंडाऱ्याची उधळण केली.
दरम्यान, 14 रोजी सौंदत्ती डोंगरावरील रेणुकादेवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सायंकाळी पाच वाजता रेणुकादेवी देवस्थान मंदिराच्या वतीने रेणुकादेवीचा पालखी सोहळा करण्यात येणार आहे. यानिमित्त रेणुकादेवीचे दर्शन घेण्याबरोबरच पालखी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरातील तब्बल 175 एसटी बसेसमधून हजारो भाविक 11 डिसेंबरच्या रात्री सौंदत्ती डोंगरी जाणार आहेत. यात्रेच्या आधी सात–आठ दिवस सौंदत्ती डोंगरावर कोल्हापुरातील चार मानाचे जग घेऊन जाण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार डोंगराकडे जाण्यासाठी बेलबागेतील शिवाजीराव आळवेकर, मंगळवार पेठेतील मदनआई शांताबाई जाधव (जोगती), टेंबेरोडवरील बयाक्का चव्हाण–संदीप पाटील, गंगावेश येथील केराबाई (लक्ष्मीबाई) जाधव यांचे रेणुकादेवीचा मोठा टाक असलेले जग बिंदू चौकातील मरगाई मंदिराजवळ दाखल झाले. यानंतर जोगती मदनआई जाधव यांच्या हस्ते जगांची आरती केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे सुभाष जाधव, अशोकराव जाधव, अच्युतराव साळोखे, मोहनराव साळोखे, युवराज मोळे, लता सोमवंशी, सतीश डावरे, करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अनिता पोवार, उपाध्यक्ष सुरेश बिरंबोळे, सचिव विजय पाटील, संजय मांगलेकर, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, किरण मोरे, प्रदीप साळोखे उपस्थित होते.
आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप केले. यानंतर जगप्रमुखांच्या कुटुंबीयांनी जगांना डोक्यावर घेऊन आझाद चौकमार्गे सौंदत्ती डोंगराकडे प्रयाण केले. वाटेत जगांवर भंडाराची उधळण करत उदं ग आई उदंचा गजर करण्यात येत होता. जग उमा चित्रमंदिरमार्गे जयंती ओढ्यावरील पुलाजवळ आल्यानंतर करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेच्या मंगल महाडिक स्वागत केले. शेकडो भाविकांना दुधाचे वाटप करत योग्य तो पाहुणचारही केला. यानंतर चारही जग पार्वती मल्टिप्लेक्सपर्यंत नेण्यात आले. येथून जगांना एसटी बसेवर विराजमान कऊन सौंदत्ती डेंगराकडे नेण्यात आले.
आजपासून लिंब नेसण्याचा विधी सुरु
कोल्हापुरातून रवाना झालेले चारही जग सौंदत्ती डोंगरावरील जोगनभावी कुंडावर रविवार 8 रोजी विराजमान करण्यात येणार आहेत. या जगांच्या साक्षीने लिंब नेसवण्याचा विधी सकाळी 10 वाजल्यापासून सुऊ केला जाणार आहे. इच्छूकांनी लिंब नेसण्यासाठी जोगनभावी कुंडाजवळ यावे, असे जोगती मदनआई जाधव यांनी सांगितले.








