प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि राज्यांचाही चौफेर विकास होत आहे. अत्यंत अद्भूतरित्या होत असलेला हा विकास विरोधकांच्या डोळ्यांना खूपत आहे. म्हणूनच ते तर्कशून्य व विसंगत आरोप करून पंतप्रधानांची आणि पर्यायाने भाजपचीही बदनामी करत आहेत. मात्र जनतेने ते आरोप गांभीर्याने घेऊ नयेत, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा खासदार अऊण सिंग यांनी केले आहे.
भाजपच्या संघटनपर्व अभियानसाठी गोव्यात आलेले श्री. सिंग यांनी शनिवारी पणजीत भाजप मुख्यालयात पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे, सरचिटणीस दामू नाईक व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांची उपस्थिती होती.
काँग्रेसने सदैव नकारात्मकच राजकारण केले. देशात लोकांची दिशाभूल करणे व विदेशात देशाची बदनामी करणे यासारखी षडयंत्रे त्यांनी चालविली. मात्र असे प्रकार कायमस्वऊपी चालत नाहीत. काँग्रेसची ही खेळी लोकांनी ओळखली. परिणामी आज प्रत्येक राज्यात त्यांच्या माथी पराभवाचा शिक्का मारला जात आहे. याउलट देशहित व लोकहित साधणाऱ्या भाजपला लोक निवडून देत आहेत, असे श्री. सिंग यांनी पुढे सांगितले.
हल्लीच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळजवळ प्रत्येक राज्यात भाजपला विजय प्राप्त होत असल्याचे पाहून काँग्रेससह आप आणि अन्य विरोधक ईव्हीएममध्ये घोटाळे करून भाजप सत्ता काबीज करत असल्याचे आरोप करत आहेत. खरे तर भारतात निवडणुकीसाठी ईव्हीएमचा होत असलेल्या वापराबद्दल अमेरिकासारख्या राष्ट्रानेसुद्धा प्रशंसा केली आहे. अशावेळी त्यात घोटाळे होण्याचा प्रश्नच येत नाही. विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली असते व हरतात तेव्हा ती वाईट ठरविली जाते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे लोकांनी लक्ष देऊ नये, असे श्री. सिंग यांनी सांगितले.
गोव्यातही विरोधकांकडून तोच प्रकार सुरू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अद्भूतरित्या विकास सुरू आहे. तो खूपत असल्याने आम आदमी पार्टीसारखे विरोधक घोटाळ्यांचे आरोप करत आहेत. या पक्षाचे राष्ट्रीय नेते जामिनावर सुटून सरकार चालवत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप तकलादू ठरतात. या विरोधकांना कुणीही गंभीरतेने घेत नाहीत. म्हणून त्यांनी केलेले घोटाळ्यांचे आरोपही कुणी गंभीरतेने घेऊ नयेत. भाजपचे डबल इंजिन सरकार अप्रतिम काम करत आहे, असा दावा सिंग यांनी केला.









