आंदोलनकर्त्यांसाठी बस उद्यापासून सेवेत; परिवहनची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक हिवाळी अधिवेशनासाठी परिवहनने 54 बसेस उपलब्ध केल्या आहेत. पोलीस बंदोबस्त, आंदोलनकर्ते व इतर कामांसाठी या बसेसचा वापर होणार आहे. दि. 9 ते 20 डिसेंबर याकाळात अधिवेशनाच्या कामासाठी या बसेस धावणार आहेत.
सुवर्णविधानसौध येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. दरम्यान याकाळात पोलीस कर्मचारी, पत्रकार, आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहेत. शिवाय विविध संघटनांकडून मोर्चे आणि आंदोलन छेडले जाणार आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी या बसेसचा वापर होणार आहे. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात राहणार आहे. पोलिसांची ने-आण करण्यासाठी बसेस वापरल्या जाणार आहेत.
हिवाळी अधिवेशनासाठी परिवहनच्या 54 बसेस जाणार असल्याने दैनंदिन सार्वजनिक बस व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. विविध मार्गावरील बसफेऱ्या कमी करून अधिवेशनासाठी बसेस पाठविल्या जाणार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बसफेऱ्यांची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. आधीच शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बसेसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच अधिवेशनामुळे बससेवेचे तीनतेरा वाजणार आहेत.
सद्यस्थितीत शैक्षणिक सहलींसाठी दररोज 20 ते 25 बसेस धावत आहेत. त्यातच आता अधिवेशनासाठी बसेस जाणार असल्याने सार्वजनिक बससेवेचे नियोजन करताना परिवहनची डोकेदुखी वाढणार आहे.









