कोल्हापूर :
कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला सहाव्यांदा निवडून दिले. त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. जनतेच्या आशीर्वादावरच हे शक्य झाले आहे. आणखी एक विधानसभेची निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूकसुध्दा मी लढवणार आहे. ती शेवटची विधानसभा निवडणूक असेल अशी घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. या निवडणुकीनंतर त्यापुढची लोकसभेची निवडणूक लढवून खासदार होऊन केंद्रात मंत्री होण्याचे माझे स्वप्न आहे, असेही त्यांनी सांगितले .येथील विश्रामगृहात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, एक लोक प्रतिनिधी दिनदलित, गोरगरीब सर्वसामान्यांची सेवा बजावत असेल तर मतदार संघातील लोक कसे पाठीशी राहतात हे या निवडणुकीतून दिसून आले आहे. यामध्ये प्रसारमाध्यमांनीही मला चांगले सहकार्य केले.
गडहिंग्लज येथील पीडित कुटुंबाची आपण भेट घेतली नाही अशी टीका विरोधकांकडून होत आहे, याबाबत विचारला असता आमदार मुश्रीफ म्हणाले, ज्यावेळी पिढीतेवर अन्याय होतो. अशावेळी त्या पिडीतेचे व तिच्या कुटुंबीयांचे नाव सार्वजनिक कधीच करायचे नसते. तसे झाल्यास समाजात त्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो आणि त्या पिडीतेचे पुनर्वसन होण्यामध्ये फार अडचणी निर्माण होतात. या प्रकरणातील नराधम लवकरात लवकर कसा पकडला जाईल व त्याला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल. हे लोकप्रतिनिधीने पाहणे आवश्यक आहे. ते मी करत आहे. माझ्या पाठपुराव्यामुळेच त्या नराधमाला मुंबईतून अटक करण्यात आली. त्या कुटुंबाला प्रत्यक्ष–अप्रत्यक्ष मदत कशी करता येईल यासाठी मी प्रयत्न करीत आहे.
जो मॅच्युअर्ड लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याने या कुटुंबाचे व पिडीतेचे नाव गुप्त ठेवायला हवे. त्यामुळे ज्यांनी या प्रकरणातील व्हिडिओ प्रसारित केला ते अनमॅच्युअर्ड असतील असेही त्यांनी सांगितले .
ते म्हणाले, पुढील पाच वर्षात महिलांचे आरक्षण वाढणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात काय होईल हे सांगता येणार नाही. यामध्ये आपल्या मतदारसंघाचे काय होणार आहे. याचे काळच उत्तर देईल. महिलांच्यामध्येही एससी, एसटी आरक्षण येणार आहे. त्यातच मतदार संघाची पुनर्रचना होणार आहे. यासाठी केंद्र शासनाने डी लिमिटेशन कमिटी नेमली आहे. याबाबतचा निर्णय पुढील लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी होईल. असे ते म्हणाले.








