झामुमोच्या 6 तर काँग्रेसच्या चौघांचा समावेश
वृत्तसंस्था/रांची
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वातील झारखंड सरकारचा गुरुवारी विस्तार करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळात एकूण 11 आमदारांचा समावेश करण्यात आला असून सर्व आमदारांना राज्यपाल संतोष गंगवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनात शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नवीन 11 मंत्र्यांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे 6, काँग्रेसचे 4 आणि राजदच्या एका आमदाराला संधी देण्यात आली आहे. तसेच स्टीफन मरांडी यांनी झारखंड विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली. राज्यपाल संतोष गंगवार यांनी त्यांना शपथ दिली.
झारखंडमध्ये 10 वर्षानंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 12 मंत्री असतील. रघुवर सरकार आणि हेमंत सोरेन यांच्या आधीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची एक जागा रिक्त होती. मंत्री झालेल्यांमध्ये झामुमोमधील दीपक बिरुआ, रामदास सोरेन, सुदिव्या सोनू, हफिजुल हसन, योगेंद्र प्रसाद आणि चमरा लिंडा यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री बनलेल्यांमध्ये डॉ. इरफान अन्सारी, दीपिका पांडे सिंग, शिल्पी नेहा टिर्की आणि राधा कृष्ण किशोर यांचा समावेश आहे. तर राजद कोट्यातील आमदार संजय प्रसाद यादव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीत शानदार विजय नोंदवल्यानंतर हेमंत सोरेन यांनी 28 नोव्हेंबर रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यावेळी त्यांनी केवळ एकट्यांनीच शपथ घेतली होती. अन्य कोणीही मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. त्यानंतर आघाडीमधील तिन्ही पक्षांनी घेतलेल्या बैठकांमध्ये मंत्र्यांचा कोटा निश्चित करण्यात आला. अनेक आमदार मंत्री होण्याच्या शर्यतीत होते. मात्र अखेर सर्वच पक्षांनी मंत्री होणार असलेल्या आमदारांची नावे ठरवून राजभवनात पाठवल्यानंतर गुरुवारी सर्वांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत महाआघाडीचे सर्व आमदार आणि मंत्री सहभागी होणार आहेत. त्यात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.









