वृत्तसंस्था/सोल
दक्षिण कोरियात मार्शल लॉवरून होत असलेल्या वादादरम्यान संरक्षणमंत्री किम योंग-ह्यून यांनी गुरुवारी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशात झालेल्या प्रचंड उलथापालथीची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर अध्यक्ष यून सुक योल यांनी संरक्षणमंत्र्याचा राजीनामा स्वीकारल्याचे अध्यक्षीय कार्यालयाकडून सांगण्यात आले. संरक्षणमंत्री किम यांच्या सल्ल्यानुसारच अध्यक्षांनी मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली होती. किम योंग यांच्या आदेशावरच सैन्य संसदेत शिरले होते. मार्शल लॉ विषयी आम्हाला काहीच माहित नव्हते. यासंबंधी टीव्हीवरून आम्हाला माहिती मिळाली, असा दावा उपसंरक्षणमंत्र्यांनी केला आहे. किम योंग यांच्या जागी आता चोई ब्युंग-ह्यूक यांना नवे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चोई हे सैन्यात फोर स्टार जनरल राहिले असून सध्या सौदी अरेबियात दक्षिण कोरियाचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.
चुंगम गटावर आरोप
देशात मार्शल लॉ लागू करण्यामागे ‘चुंगम गटा’चा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षाचे खासदार किम मिन सोक यांनी केला आहे. चुंगम हे राजधानी सोल येथील एक हायस्कूल असून जेथून अध्यक्ष आणि त्यांच्या मित्रांनी शिक्षण घेतले होते. अध्यक्ष झाल्यावर यून यांनी स्वत:च्या मित्रांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले होते. या सर्वांकडे मार्शल लॉ लागू करण्यावरून अनेक अधिकार होते आणि ते अनेक महिन्यांपासून याची तयारी करत होते. संरक्षणमंत्री किम यांनी देखील चुंगम हायस्कूलमध्येच शिक्षण घेतले होते आणि ते अध्यक्ष किम योंग जुने मित्र आहेत. मार्शल लॉची घोषणा करण्यापूर्वी अध्यक्षांनी एक बैठक घेतली होती, ज्यात अर्थ आणि विदेश मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता. परंतु अध्यक्षांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले होते असे आता समोर आले आहे.









