अनैतिक संबंध उघडकीस आल्याने केला खून : वर्षभरानंतर छडा लावण्यात यश
बेळगाव : अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे पत्नीने आपल्या प्रियकरासमवेत पतीचा काटा काढल्याची घटना तब्बल वर्षभरानंतर उघडकीस आली आहे. रायबाग तालुक्यातील इटनाळ येथील महिलेसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. प्रकाश शिवबसू ऊर्फ शिवबसप्पा बेन्नाळ्ळी, दानव्वा ऊर्फ दानम्मा मल्लाप्पा कंबार, रामप्पा मादर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. इटनाळ व दरुरजवळ कृष्णा नदीपात्रावर खुनाची ही घटना घडली आहे. खुनानंतर एक वर्षाने एफआयआर दाखल करून या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे.
मल्लाप्पा बसाप्पा कंबार याचा मृतदेह आढळून आला होता. त्याची पत्नी दानव्वा आपल्या दोन मुलांसमवेत बेपत्ता झाली होती. यासंबंधी दानम्माचे वडील दुंडाप्पा कंबार यांनी आपली मुलगी दोन मुलांना घेऊन बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. 11 जून 2023 पासून ती बेपत्ता होती. 1 जुलै 2023 रोजी आपल्या मुलांसमवेत ती इटनाळला परतली होती. पतीचा त्रास वाढल्यामुळे आपण मुलांना घेऊन बेंगळूरला गेले होते, अशी जबानी दानव्वाने पोलीस स्थानकात दिली होती. खरी गोष्ट वेगळीच होती. दानव्वा व प्रकाश बेन्नाळ्ळी यांच्यातील अनैतिक संबंध दानव्वाचा पती मल्लाप्पा कंबारला समजले होते. त्यामुळे आता आपण प्रकाशला सोडणार नाही, अशी धमकी खून झालेल्या मल्लाप्पाने दिली होती. याची कुणकुण लागल्याने मल्लाप्पाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.
14 नोव्हेंबर 2024 रोजी मल्लाप्पाची आई पारव्वा कंबार हिने हारुगेरी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. आपला मुलगा मल्लाप्पाला इटनाळ येथील रामप्पा मादरने मोटारसायकलवरून नेले होते. तेव्हापासून तो घरी परतला नाही, अशी फिर्याद आईने दाखल केली होती. हारुगेरी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून पतीसमोर पत्नीचे अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे पत्नीने आपला प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा खून करून कृष्णा नदीत मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. खुनासाठी वापरलेली मोटारसायकल व मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. मल्लाप्पाचा मृतदेह 27 डिसेंबर 2023 रोजी अथणी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दरुरजवळ आढळून आला होता.









