बेळगाव : व्हॅक्सिन डेपो मैदानानजीकच्या रस्त्यावर विनापरवाना महामेळावा आयोजित करणे, तसेच प्रक्षोभक भाषण केल्याच्या खटल्यात जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात बुधवार दि. 4 रोजी पोलीस अधिकाऱ्याची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी 16 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 13 नोव्हेंबर 2017 रोजी व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महामेळाव्याला परवानगी देण्यात न आल्याने मैदानानजीकच्या रस्त्यावर व्यासपीठ उभारून त्याठिकाणी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
रस्त्यावर व्यासपीठ उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, त्याचबरोबर माजी आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील उपस्थित नेत्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत टिळकवाडीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक जी. एम. देशनूर यांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, दिगंबर पाटील, मालोजी अष्टेकर, यांच्यासह सहा संयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. टिळकवाडीचे तत्कालिन पोलीस एच. एच. कम्मार यांची बुधवारी साक्ष नेंदविण्यात आली. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी 16 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. समिती नेत्यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे काम पहात आहेत.









