शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रयत्न : तरुण व्यावसायिकांच्या माध्यमातून सुधारणा
बेळगाव : तरुण व्यावसायिकांना एकत्रित आणून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न यंग मेन्स ऑर्गनायझेशन ऑफ राऊंड टेबल इंडियाच्या माध्यमातून केला जात आहे. संस्थेने 1997 पासून आजपर्यंत तब्बल 9 हजार 272 वर्गखोल्या बांधल्या आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न राऊंड टेबलमार्फत केला जात आहे. आजवर 10 लाख विद्यार्थ्यांना 485 कोटी रु. खर्च करून विविध सेवा पुरविल्या आहेत. यामध्ये 3 हजार 782 प्रकल्पांचा समावेश आहे. सामाजिक हेतूने अनेक शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर केले आहे. राऊंड टेबल ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीनिवास रायबागी, उपाध्यक्ष सागर एन. एस., सचिव निखिल जैन, खजिनदार गौरव देसाई यांच्या नेतृत्वाखाली 20 सदस्यांचा गट प्रकल्पांचे नेतृत्व करत आहे. सध्या बेळगावमधील कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहा वर्गखोल्या बांधण्यात येत आहेत. यासाठी अंदाजे 43 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर न्यू गर्ल्स हायस्कूलमध्ये स्मार्टबोर्ड बसविण्यात येणार असून यासाठी 2 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. शिक्षणासह अनाथ मुलांना खाद्यपदार्थ देणे, वंचित मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती राऊंड टेबल इंडियातर्फे देण्यात आली.









