सीमाभागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
बेळगाव : गरीब कुटुंबातील महिलांच्या सोयीसाठी चिकोडी आणि खानापूर येथे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रसूतिगृहांचे अद्याप लोकापर्ण झालेले नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. गर्भवतींना नजीकच्या महाराष्ट्रातील प्रसूति केंद्रामध्ये दाखल व्हावे लागत आहे. सीमाभागातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून चिकोडी येथे 2015 मध्ये 20 कोटी रुपये खर्चातून 100 खाटांचे प्रसूतिगृह उभारण्यात आले असून, याचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. चिकोडी तालुका परिसरातून प्रत्येक महिन्याला 500 हून अधिक महिलांची प्रसूति होत असते. चिकोडी तालुक्यातील बहुतांश गावे महाराष्ट्राच्या सीमेवर आहेत. त्यामुळे सहाजिकच गर्भवतींना प्रसूतिसाठी महाराष्ट्राच्या मिरज, सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मात्र रूग्णालयाचे शुल्क गरीब कुटुंबांना भरणे शक्य होत नाही.
खानापुरातील प्रसूतिगृह म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’
खानापूर शहरातही 15 कोटी रुपये खर्चातून 60 खाटांचे प्रसूतिगृह उभारण्यात आले आहे. दोन वर्षापूर्वी हे प्रसूतिगृह उभारलेले असले तरी, अद्याप याचे लोकार्पण झालेले नाही. 2023 मध्ये विधानसभा निवडणूक काळात या प्रसूतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र तेथे आवश्यक वैद्यकीय उपकरणे व कर्मचारी नाहीत. त्यामुळे प्रसूतिगृह म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे चिकोडी व खानापुरातील सरकारी प्रसूतिगृहांचे लोकापर्ण झालेले नाही, अशी प्रक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता
बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 7 प्रसूतिगृहांपैकी चिकोडी व खानापूर शहरात कोट्यावधी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या प्रसूतिगृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
चिकोडीतील प्रसूतिगृहाला टाळे
तीन आठवड्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिकोडी येथे प्रसूतिगृहाचे उद्घाटन केले. प्रसूतिगृहातून वैद्यकीय सेवेला सुरूवात होताच एका बाळंतिणीचा येथे मृत्यू झाला. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन या प्रसूतिगृहाला टाळे ठोकले आहेत. याशिवाय कोणतीही माहिती न देता चिकोडी येथे प्रसूतिगृह सुरू केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांना, तालुकाधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रसूतिगृह लगबगीने सुरू करण्याचे कारण काय? असा प्रश्न तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्याने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काहीच उत्तर मिळालेले नाही.
बालचिकित्सकाची त्वरित नेमणूक करा
चेकोडी येथील प्रसूतिगृहात स्त्राrरोग तज्ञ 1, भूलतज्ञ 2, बालचिकित्सक 1, परिचारिका 21, रेडीओलॉजिस्ट 1, फार्मासिस्ट 1, डी ग्रुप कामगार 6 अशा एकूण जागांना सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये बालचिकित्सक वगळता बाकी सर्व जागांवर नेमणूक झाली आहे. बालचिकित्सकाची त्वरित नेमणूक व्हावी अशी मागणी आहे.









