गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
खानापूर : तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रातील शिरोली येथील सरकारी हायस्कूलमधील विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक नसल्याने गेल्या सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पालकानी अनेकवेळा अर्ज विनंत्या करूनही गटशिक्षणाधिकाऱ्यानी शिरोली हायस्कूलमध्ये शिक्षकाची नेमणूक केली नव्हती. शेवटी पालकानी शाळेला टाळे ठोकून विद्यार्थ्यांना घेऊन बीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी व विजय मादार, दीपक गावकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक देण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या काही वर्षापासून या हायस्कूलमध्ये शिक्षक आणि इतर कारणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मुख्याध्यापकांच्या कामचुकारपणामुळे इतर शिक्षकही वेळेवर शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत पालकानी वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या होत्या. गटशिक्षणाधिकाऱ्याकडून पालकांना तोंडाला पाने पुसण्याचेच काम होत होते. गेल्या सहा महिन्यापासून गणित, विज्ञान विषयाचे शिक्षकच नसल्याने एकही धडा शिकवलेला नाही. त्यामुळे गणित आणि विज्ञान विषयाचा अभ्यासच झालेला नाही.
यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी आणि ग्रा. पं. सदस्य संघटनेचे विनायक मुतगेकर आंदोलनस्थळी दाखल झाले. यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर विजय मादार, दीपक गावकर, सागर तिनेकर, सुशील देसाई, बाबासाहेब करंबळकरसह पालकानी गटशिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरून शिक्षकाची नेमणूक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतल्यावर डिसेंबर ते मार्चपर्यंत कायमस्वरुपी शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देवून तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सावळा गोंधळ थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.









