कंग्राळी खुर्द ग्रा. पं. बैठकीत इशारा : साहित्यासह वाहन जप्त करणार : निर्णयाला महिला मंडळांसह विविध संघटनांचा पाठिंबा
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावामध्ये कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा घरगुती कार्यक्रमाला डॉल्बी सिस्टिम लावण्यास सक्त मनाई केली असून ग्रा. पं. च्यावतीने कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच डॉल्बी लावल्यास सिस्टिमसह वाहनसुद्धा जप्त केले जणार असून संबंधितांवर एफआयआर दाखल केले जाणार आहे. याला गावातील सर्व महिला मंडळांसह विविध संघटनांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला असून तालुक्यातील इतर गावांतील मंडळांनीही याचे अवलोकन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. कंग्राळी खुर्द महात्मा फुले मंगल कार्यालयात रविवारी ग्रा. पं. उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. युवावर्गासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रास्ताविक व स्वागत नवजागृती सेवा संघाचे प्रतिनिधी पुंडलिक पाटील यांनी केले. त्यानंतर विधायक मुद्दे मांडताना डॉल्बीच्या कर्कश आवाजाच्या धक्क्याने गावात नागरिक मृत झाल्याची घटनाही घडली आहे. डॉल्बीच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, वयोवृद्ध, गर्भवती महिला, आजारी लोक, तरुणांतील वाढते हेवेदावे यावर कसा विपरित परिणाम होत आहे, याचे विवेचन करण्यात आले. यामुळेच डॉल्बी लावणे पूर्णपणे बंदी घालणे गरजेचे आहे. हे बैठकीला उपस्थितांनी आपल्या मनोगतातून पटवून दिले.
डॉल्बी बंदी स्वत:पासून करावी
कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बी न लावणे हे प्रत्येकांनी स्वत:च्या कार्यापासून सुरुवात करुया, असेही सांगण्यात आले. यावेळी काही अतिउत्साही तरुणवर्ग आपण वेळेचे बंधन पाळतो. त्यामुळे ठराविक वेळेसाठी परवानगी देण्याची मागणी करत होते. परंतु यालाही उपस्थित सर्वांकडून विरोध झाल्याने ग्रा. पं. उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील यांनी गावासह उपनगरातील कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बी लावता येणार नाही, असे जाहीर केले. तसेच यापूर्वीच ग्रा. पं.मध्ये डॉल्बी न लावण्यासंदर्भात ठराव होऊनही गावातील एक, दोन अतिउत्साहींनी पोलीस खात्याची परवानगी आहे, असे भासवून डॉल्बी लावल्याने ही तातडीची बैठक घ्यावी लागली, अशा प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केल्या. तसेच पुन्हा गावात डॉल्बी लावण्याचा प्रकार घडला तर ग्रा. पं. सर्व सदस्य व अन्य नागरिक कार्यक्रमस्थळी जाऊन डॉल्बी बंद पाडतील, असा इशाराही देण्यात आला आहे. बैठकीला ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, गावडे कमिटी सदस्य भैय्या पाटील, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, माजी अध्यक्षा रुक्मिणी निलजकर, वैजनाथ बेन्नाळकर, सदस्या लता पाटील, ज्योती पाटील, सुनिता जाधव आदींसह नवजागृती सेवा संघ सदस्यांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. निवृत्त मुख्याध्यापक पी. वाय. पाटील यांनी सूत्रसंचालन तर नवजागृती सेवा संघाचे अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आभार मानले.
पोलीस खाते व इतर अधिकाऱ्यांना निवेदन देणार
कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बी न लावणे संदर्भात खबरदारी म्हणून येत्या दोन दिवसात स्त्री-पुरुष व तरुणांच्या मोठ्या प्रमाणात सह्यानिशी डीसी, एसपी व सीपीआय यांना निवेदन देण्यात येणार आहे, असेही या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.









