वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने महिलांच्या 20 व्या आशियाई हँडबॉल चॅम्पियनशिपची सुरुवात विजयाने केली असून त्यांनी हाँगकाँगवर 31-28 अशी निसटती मात केली. भावना शर्मा व मेनिका यांच्या चमकदार प्रदर्शनामुळेच भारताला या सामन्यात विजय मिळविता आला. भारताने सामन्याला सकारात्मक सुरुवात केली आणि प्रियांका ठाकुरने भारताचा पहिला गोल नोंदवला. 2022 मध्ये झालेल्या महिलांच्या कनिष्ठ हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताला विजय मिळाला होता, त्यात प्रियांका ठाकुरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही क्षणानंतर अनुभवी मेनिकाने आपले खाते उघडताना भारताला भक्कम स्थितीत नेले. भारतीय बचावफळीनेही भक्कम कामगिरी करीत हाँगकाँगचे अनेक प्रयत्न वाया घालविले. कर्णधार दीक्षा कुमारीने तीन पेनल्टी थोपवण्यात मोलाची कामगिरी केली. मध्यंतराला भारताने 16-10 अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर हाँगकाँगने आक्रमण तेज केले आणि आक्रमणातून लाभ घेण्याचे धोरण त्यांनी अवलंबले. पण भारताने भक्कम बचाव करीत यश मिळू दिले नाही. अखेर भारताने हा सामना 31-28 अशा तीन गोलांच्या फरकाने जिंकला.









