15.48 अब्ज देवाणघेवाणीचे व्यवहार : ऑक्टोबरमध्ये केला होता विक्रम
नवी दिल्ली :
डिजिटल पेमेंट प्रणाली यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये नोव्हेंबर मध्ये 7 टक्के इतकी घट झाली असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून 15.48 अब्ज इतके व्यवहार करण्यात आले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. हा एकंदर पेमेंट व्यवहार नोव्हेंबरमध्ये 21.55 लाख कोटी रुपयांचा झाला आहे.
ऑक्टोबरमध्ये सर्वकालीक उच्चांक
व्यवहार किमतीच्या तुलनेमध्ये पाहता 8 टक्के इतकी घसरण गेल्या महिन्यामध्ये दिसून आली. ऑक्टोबरमध्ये यूपीआय पेमेंटने सर्वकालिक उच्चांकी स्तर गाठला होता. त्या महिन्यात 16.58 अब्ज इतके यूपीआय अंतर्गत देवाणघेवाणीचे व्यवहार झाले होते. त्यावेळेला 23.50 ट्रिलियन इतक्या किमतीचे व्यवहार झाले होते. 2016 मध्ये यूपीआय प्रणाली लागू झाल्यानंतर ऑक्टोबरमधली सर्वात मोठी देवाण-घेवाण व्यवहाराची संख्या राहिली. मागच्या नोव्हेंबरमध्ये सरासरी 516 दशलक्ष इतके यूपीआयचे दररोज व्यवहार झाले आहेत.
वार्षिक कामगिरी
वर्षाच्या आधारावर पाहता यूपीआय प्लॅटफॉर्मने जवळपास 38 टक्के इतका विकास व्यवहारांमध्ये नोंदवला आहे. किमतीच्या तुलनेमध्ये व्यवहारात ही वाढ 24 टक्के नोंदली गेली आहे. सप्टेंबर महिन्यात
यूपीआय अंतर्गत व्यवहारांची संख्या 15.04 अब्ज इतकी होती यातून 20.64 ट्रिलियन किमतीचा व्यवहार झाला. तांत्रिकदृष्ट्या पेमेंटच्या बाबतीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे नोव्हेंबरमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये काहीशी घसरण पाहायला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.









