कोलकाता :
नोव्हेंबर महिन्यात विजेच्या वापरात 4 टक्के वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. भारतात नोव्हेंबर महिन्यामध्ये ऊर्जेचा वापर 124.5 अब्ज युनिट्स वर पोहोचला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता ही वाढ 4 टक्के इतकी नोंदली गेली आहे.
नोव्हेंबरमध्ये हिवाळ्याची सुरुवात झाली असून 207 जीडब्ल्यू इतकी मागणी विक्रमी स्तरावर दिसून आली आहे. मागच्या वर्षी 204 जीडब्ल्यू इतकी मागणी होती. यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरला विजेची मागणी सर्वाधिक राहिली आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विजेची मागणी वाढलेली दिसली होती. त्यामुळे या वेळेला मागणीमधला ट्रेंड बदललेला दिसून आला.
कोळशाचा साठा पुरेसा
ऊर्जा निर्मिती केंद्रांकडे 29 नोव्हेंबरपर्यंत 39.8 दशलक्ष टन इतका कोळशाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. यामध्ये 3.4 दशलक्ष टन इतका आयातीत कोळसा असल्याचे सांगितले जात आहे.
हिवाळ्याच्या हंगामासाठी लागणाऱ्या विजेची पूर्तता करण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये कोळशाची साठवणूक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान कोळशाचे उत्पादन 90.62 दशलक्ष टनवर पोहोचले आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये कोळशाचे उत्पादन 84.52 दशलक्ष टनवर राहिले होते. त्या तुलनेमध्ये पाहता कोळशाचे उत्पादन यंदा 7.2 टक्के इतके वाढले आहे.









