गोमंतकीय तरुणांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन : कंत्राटी नोकरीपेक्षा व्यावसायिक बनणे चांगले
पणजी : राज्यातील तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा विविध क्षेत्रात व्यवसायाच्या संधी शोधाव्यात. त्यायोगे इतरांनाही नोकरीच्या संधी प्राप्त करून द्याव्या व स्वत: नोकरदाते बनावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनतर्फे आयोजित विद्यार्थी इंटर्न मित्र गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अक्षय ऊर्जा व कचरा व्यवस्थापन क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. अशावेळी बेकार राहून नोकरीची प्रतीक्षा करण्यापेक्षा तरुणांनी व्यवसायाच्या संधी शोधाव्या, त्यातून स्वत:बरोबरच इतरांनाही नोकरी मिळवून देणारे व्यावसायिक बनावे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
कंत्राटी नोकऱ्यांपेक्षा व्यवसाय करा
आज बहुतेक नोकऱ्या या कंत्राटी पद्धतीनेच दिल्या जातात. तेथे दीर्घकाळ काम कऊनही काहीही फायदा होत नसतो. त्यामुळे कंत्राटी नोकऱ्या करणाऱ्या तरुणांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. कचरा व्यवस्थापन हे असे क्षेत्र आहे जेथे सरकार दरवर्षी कचरा उचलण्यासाठी 350 कोटी रुपये खर्च करते. या संधीचा फायदा घेऊन तरुणांनी कचऱ्यातून व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बिगर गोमंतकीय कंत्राटदार कोट्याधीश
आज कचरा उचण्याच्या व्यवसायात 90 टक्के कंत्राटदार हे बिगर गोमंतकीय आहेत. याच कचऱ्यातून ते कोट्याधीश बनले आहेत. ते स्वत: कोट्यावधींच्या लक्झरी गाड्या घेऊन फिरत आहेत. अशावेळी आमच्या युवकांची मानसिकता मात्र कारकुनी नोकरीवरच अडून राहिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज नोकरी शोधणाऱ्या प्रत्येक तरुणाने राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण ‘थिंकिंग’ करावे. त्याद्वारे स्वत:मध्ये व्यवसाय संस्कृती विकसित करण्यावर भर द्यावा, स्वत:मध्ये उद्योजक बनण्याची मानसिकता निर्माण करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यासाठी युवकांनी केवळ पुढे यावे, केंद्र आणि राज्य सरकार मदत करण्यास तयार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.









