रस्त्याच्या मध्यभागापासून 50 फुटाचे रुंदीकरण होणार : नुकसानभरपाईसाठी अहवाल पाठविणार
वार्ताहर/सांबरा
निलजी ते सांबरा विमानतळापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी सांबरा ग्रामपंचायतीच्या वतीने घरे, मालमत्ता व आस्थापनांचे सर्वेक्षण करून सर्व माहिती घेण्यात आली. निलजी ते सांबरा विमानतळापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला प्रत्येकी 50 फुटाचा रस्ता करण्यात येणार आहे. एकूण शंभर फुटाचा हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यामध्ये खुली जागा, घरे व आस्थापने मोठ्या प्रमाणावर जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते, अरण्य खाते, तलाठी व संबंधित खात्यांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून आता ग्रामपंचायतीमार्फत घरे व आस्थापनांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. रस्त्यामध्ये कोणाकोणाची घरे, आस्थापने जाणार आहेत याची प्रत्यक्ष पाहणी करून मालकांचे नाव व संबंधित कागदपत्रांची पाहणी करून अहवाल तयार करणार आहे. हा अहवाल वरिष्ठांकडे गेल्यानंतर नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यांना योग्य नुकसान भरपाई देऊन रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.सर्वेक्षण करताना पीडिओ सिद्धलिंग सरूर, रूपसिंग राठोड, ग्रा. पं. उपाध्यक्ष माऊती जोगानी, माजी अध्यक्ष लक्ष्मण कोळ्यापगोळ, सदस्य मल्लाप्पा कांबळे, विक्रम सोनजी आदी उपस्थित होते.









